पुणे (हवेलीनामा वृतसमूह) शेतक-यांच्या जोडव्यवसायातील दुभती जनावरे चोरी करणारी सराईत टोळी गजाआड करून पाच गुन्हे उघडकीस आणले आणि पाच जनावरे व गुन्हयात वापरलेली पिकअप वाहन असा एकूण रु. ६,१०,०००/- किं चा मुद्देमाल हस्तगत करत स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्हा उघडकीस आणला.

ओतुर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये,दि.१२/१२/२०२५ रोजी मधुकर रामजी गायकर वय ६५ वर्षे व्यवसाय शेती रा. आंबेगव्हाण ता. जुन्नर जि. पुणे यांच्या गोठयातील दोन म्हशी पैकी एक म्हैस चोरीस गेल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.जुन्नर उपविभाग परिसरात मागील काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांची जनावरे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. तसे ओतूर, जुन्नर, आळेफाटा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. शेतकरी शेती या मुख्य व्यवसायासोबत पुरक व्यवसाय म्हणून पशुपालन करतात त्या द्वारे दुग्धव्यवसाय करून कुटुंबाचे उपजिवीके करीता आधार निर्माण होतो, शेतक-यांची दुभती जनावरे चोरी गेल्याने कुटुंबातील लहान मुलांकरीता आवश्यक दुधाची कमतरता भासून शेतकऱ्यावर बाहेरून दुध खरेदी करण्याची वेळ आली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व संताप निर्माण झाला होता.

गुन्हयांची शृंखला व गंभीरता लक्षात घेवून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी गुन्हे उघडकीस आणणेकरीता एक विशेष तपास पथक स्थापन केले. सर्व घटनास्थळाची पाहणी करून फिर्यादी व साक्षीदार यांचेकडे चौकशी केली, सर्व गुन्हयांमध्ये दुभती जनावरे ही रात्रीचे वेळी चोरीस गेली होती. त्याचप्रमाणे चारचाकी पिकअप वाहनाचा वापर करणेत आल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुमारे १२० किमी पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासणेत आले. प्रत्येक गुन्हयातील चोरी करणारे वाहन हे माळशेज घाटाकडे जात असल्याचे समोर आले. गुन्हयांचा तपास सुरू असताना गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार नरेशी भाऊ मोरे रा. कळबड ता. मुरबाड जि ठाणे याने त्याचे साथीदाराचे मदतीने वरील गुन्हे केले असून त्याचे जवळ पिकअप चारचाकी वाहन आहे, त्या बातमीचे आधारे संशयित आरोपीबाबत माहिती काढून खात्री करत असताना, दि. २४/१२/२०२५ रोजी तपास पथक हे ओतूर परिसरात गुन्हे तपास करत असताना आरोपी नरेश भाऊ मोरे व त्याचा साथीदार असे पिकअप वाहनात म्हैस घेवून विक्री साठी जात असून ते सध्या खुबी गावचे जंगलाजवळ आहेत, तपास पथकाने १) नरेश भाऊ मोरे वय ३९ वर्षे, व्यवसाय शेती, रा. कळवड ता. मुरबाड, जि. ठाणे २) सुरज अशोक पारधी वय १९ वर्षे रा. कळंबड, ता. मुरबाड, जि.ठाणे यांना त्यांचे ताब्यातील पिकअप चारचाकी वाहन नं. एम.एच. ०५ डी. के. २७६१ सह ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांचेकडील चौकशीत एकूण ०५ म्हशी हस्तगत केल्या असून गुन्हयात वापरलेल्या वाहनासह एकूण ६,१०,०००/- किं.चा. मुद्देमाल हस्तगत करणेत आहे.

यामध्ये ओतूर,जुन्नर,आळेफाटा गुन्हयातील नरेश भाऊ मोरे याचेवर जनावर चोरीचे एकूण ०९ गुन्हे दाखल आहेत.

दुभती जनावरे शेतकऱ्यांना पुन्हा ताब्यात मिळाल्याने शेतकऱ्यांना व कुटुंबातील सदस्यांना आनंद झाल्याने त्यांनी पोलीसांचे कर्तव्यपुती प्रति समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार मानले आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जुन्नर विभाग जुन्नर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स.पो.नि. महादेव शेलार, ओतूर पो स्टे चे स.पो.नि. लहू थाटे, स्था.गु.शा. चे पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदीप वारे, राजु मोमीण, अक्षय नवले तसेच ओतुर पोलीस स्टेशनचे पो. हवा. नदीम तडवी, दिनेश साबळे, रोहित बोंबले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *