अतुल देशपांडे,

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) सातारा येथे होत असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त अभिनव उपक्रमांद्वारे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरेल यासाठी संयोजन समितीच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. सातारा जिल्ह्याला साहित्यिकांची समृद्ध परंपरा लाभली आहे आणि मराठी साहित्य क्षेत्रात या साहित्यिकांचे मोलाचे योगदान आहे. अशा साहित्यिकांच्या स्मृती जागविण्यासाठी आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्याची महती कळण्यासाठी गुरुवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी सातारा जिल्ह्यातील दिवंगत साहित्यिकांच्या निवासस्थानापासून ते संमेलन स्थळापर्यंत ‘साहित्य प्रेरणा ज्योत’ काढली जाणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) व मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत सातारा येथील शाहू स्टेडियम येथे आयोजित करण्यात आले आहे.

साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ यांच्या अध्यक्षतेखाली व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांच्या समन्वयाने साहित्य प्रेरणा ज्योत या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. साहित्य प्रेरणा ज्योत हा आजपर्यंतच्या साहित्य संमेलनांच्या इतिहासातील आगळावेगळा उपक्रम ठरणार आहे.

नगर वाचनालय सातारा येथून थोरले प्रतापसिंह महाराज; प्रतापसिंह हायस्कूल सातारा येथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर; अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना शेंद्रे येथून अभयसिंहराजे भोसले; मर्ढे येथून बा. सी. मर्ढेकर; वाई येथून लक्ष्मणशास्त्री जोशी; नायगाव येथून सावित्रीबाई फुले; फलटण येथून बेबीताई कांबळे, प्राचार्य शिवाजीराव भोसले; कटगुण येथून महात्मा ज्योतिबा फुले; एनकूळ येथून उत्तम बंडू तुपे; रहिमतपूर कोरेगाव येथून ना. ह. आपटे, वसंत कानेटकर, कवी यशवंत; कराड येथून यशवंतराव चव्हाण, गोपाळ गणेश आगरकर, संत सखु बाई, इंदिरा संत; पाटण येथून कवी विहंग, कवी शाहीर भाऊ फक्कड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साहित्य प्रेरणा ज्योती संमेलनस्थळी आणल्या जाणार आहेत. गावागावातून निघणाऱ्या साहित्य प्रेरणा ज्योतींचे स्वागत ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

साताऱ्यातील शिवतीर्थ या ठिकाणी सर्व तालुक्यातील साहित्यिक प्रेरणा ज्योती गुरुवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी एकत्र येत शाहू स्टेडियममधील मुख्य मंडपात विराजमान होणार आहेत. दुपारी ३ वाजता संमेलनस्थळी ‘साहित्य प्रेरणा ज्योतीं’चे स्वागत ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी असणार आहेत. तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असेल.

जिल्ह्यातील सर्व साहित्यिक या उपक्रमामध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत. या विषयी गावोगावी जनजागृती होत असून हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीतील सर्व पदाधिकारी कसोशीने प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती रवींद्र बेडकीहाळ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *