किरण खुडे

राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘महाडीबीटी’ शेतकरी योजनांतर्गत, खेड तालुक्यातील लाभार्थ्यांना ट्रॅक्टर आणि आधुनिक शेती औजारांचे वाटप आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

शासनाच्या कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे पारदर्शक पद्धतीने निवड झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडुन तुषार, ठिबक सिंचन योजनांसाठी ८० टक्के, ट्रॅक्टर साठी १ लाख २५ हजारांचे अनुदान तर ट्रॅक्टर औजारांसाठी ५० टक्के अनुदान मिळत असते याचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार बाबाजी काळे यांनी यावेळी केले.

याप्रसंगी तालुक्यातील ३८ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे आणि ४५६ ट्रॅक्टर औजार साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे, दिनेश.सावंत, मडंळ अधिकारी कर्मचारी, विविध कंपनीचे ट्रॅक्टर वितरक आणि शेती औजार विक्रेत्यांसह लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.यावेळी विविध अश्वशक्तीचे (HP) ट्रॅक्टर, रोटॅव्हेटर, नांगर, कल्टीवेटर आणि पेरणी यंत्राचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. या अर्थिक वर्षात आतापर्यत तालुक्यातील ८०६ लाभार्थ्याची ट्रॅक्टर, आणि ट्रॅक्टरसाठी लागणा-या शेती औजारासह सिंचन योजनेसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली. त्याप्रमाणे ३५० शेतकऱ्यांना ठिंबक सिंचन योजना मंजुर झाली तर १८० ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी घेतले तसेच २७५ लाभार्थ्यांनी २७५ शेतीपुरक कृषीऔजारे मंजुर झाली. १०० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा झाले असुन १६८ शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच अनुदान जमा होणार आहे. तालुक्यातील ६४३५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले असुन १८९० शेतकऱ्यांची निवड झाली आहे. जशी कागदपत्रे लाभार्थी जमा करुन देतील त्याप्रमाणे अनुदानासाठी पुढे पात्र लाभार्थी प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांनी सांगितले.

 

 

   शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कमीत कमी क्षेत्रात भरघोस उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेतीसाठी बैल सांभाळणे आजच्या काळात परवडत नसल्याने बैलांच्या सहाय्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नगण्य झाली आहे. शेतीला लागणारे मजुर मिळणेही अवघड झाले आहे. याकरिता यांत्रिकीकरणावर विशेष भर देणे काळाची गरज आहे. 

-बाबाजी काळे ( आमदार, खेड तालुका )

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *