अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) “फड सांभाळ ऊस तुऱ्याला आला” या मराठी जुन्या सुप्रसिद्ध गीताची आठवण शेतातील ऊस पिकाला आलेल्या तुऱ्यांची दृश्ये पाहिल्यावर ओठावर येतात .सध्या पश्चिम महाराष्ट्रातील विविध सहकारी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असला तरी पिकाची काढणी अद्याप झाली नसल्यामुळे या ऊस पिकाला प्रचंड प्रमाणात मोठे तुरे आले आहेत. या तुर्यांमुळे नक्कीच वजनामध्ये घट होते ,आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा तोटा होतो. मात्र याचे सहकार खात्याला काय घेणे देणे असाच उद्विग्न प्रश्न या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून या पिकाकडे पाहिल्यावर मनात येतो हे मात्र नक्की.
शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांमध्ये ऊस पिकाचे हमखास नाव घेतले जाते विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्पन्नाची हमी देणारे पीक म्हणून अनेक वर्षांपासून ऊस पिकाला शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिलेली दिसते परंतु अलीकडच्या काळामध्ये साखर कारखान्याच्या हलगर्जीपणा तसेच लहरीपणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड देण्याची वेळ आली आहे शेतात उभे उसाचे पीक कधी जाणार याची काळजी शेतकऱ्याला लागलेली असते जवळपास 18 महिने ऊस शेतात उभा असतो परंतु त्यानंतरही कारखान्याकडून हा ऊस वेळेत तोडला जाईल याची शाश्वती मात्र शेतकऱ्यांना नसते त्यामुळे या पिकांना तुरे येऊन शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते.
