सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) खटाव तालुक्यातील चितळी येथील सेवानिवृत्त अॅग्रो सायंटिस्टला ‘डिजिटल अरेस्टची भीती दाखवून न त्याच्याकडून तब्बल १ कोटी ३९ लाख ५० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल होताच सातारा सायबर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत १९३० सायबर पोर्टलच्या माध्यमातून ६ लाख ३० हजार रुपयांची रक्कम होल्ड करण्यात यश मिळवले.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालोजीराव नामदेव पवार (वय ७३, रा. चितळी, ता. खटाव) हे अॅग्रो सायंटिस्ट असूनते सुमारे १५ वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. दि. १४ रोजी शेतात काम करीत असताना त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. आपण टेलिकॉम सर्व्हिसमधून बोलत असल्याचे सांगून, तुमचा मोबाइल क्रमांक व आधार कार्ड ब्लॉक करण्यात येणार आहे. तुमच्या आधारचा गैरवापर करून संदीप कुमार नावाच्या व्यक्तीने आयसीआयसीआय बँकेत खाते उघडून त्यातून ८ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे सांगण्यातआले. यानंतर फोन सीबीआयकडे जोडत असल्याचे सांगून प्रदीप सिंग, सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या व्यक्तीने पवार यांच्याशी संवाद साधला.
संदीप कुमारच्या घरी छापा टाकून १८० पासबुक, रोख रक्कम, एटीएम, चेकबुक व डेबिट कार्ड सापडल्याचे सांगत त्यांचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आले. या प्रकरणाची कुणालाही माहिती दिल्यास अटक होईल, अशी धमकीही देण्यात आली. या भीतीपोटी पवार यांनी कोणालाही काहीही न सांगता आरोपींच्या सूचनेनुसार वेगवेगळ्या टप्यांत विविध बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग केले. दरम्यान, आरोपींनी वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून व्हिडिओ व ऑडिओ कॉल करून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बनावट पत्र व सर्वोच्च न्यायालयाची कथित ऑर्डर पाठवत कायदेशीर कारवाई व अटकेची भीती दाखवली. यामुळे पवार यांनी एकूण १ कोटी ३९ लाख ५० हजार रुपये आरोपींना पाठवले. दि. १२ डिसेंबर रोजी आरोपींनी हिंदी व इंग्रजी भाषेत व्हॉट्सअॅप संदेश पाठवून तुम्हाला या केसमधून मुक्त करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर संपर्क बंद झाल्याने आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच पवार यांनी सातारा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३१८, ३१९, ३५१ तसेच माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ व ७७ अन्वये ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून सायबर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत १९३० सायबर पोर्टलच्या माध्यमातून ६ लाख ३० हजार रुपयांची रक्कम रोखण्यात (होल्ड) यश मिळविले. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.
नागरिकांनी अशा प्रकारच्या फोन कॉल, व्हॉट्सअॅप संदेश व धमक्यांना बळी न पडता तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा,असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे…राजेंद्र सावंत्रे, पोलीस निरीक्षक, सायबर विभाग.
