सातारा, (हवेलीनामा प्रतिनिधी) फलटणच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात आरोपी पोलीस अधिकारी असल्याने तपास योग्य पद्धतीने व्हावा म्हणून त्रयस्थ आणि स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करावी. पोलीस यंत्रणे शिवाय स्वतंत्र यंत्रणेकडे या गुन्ह्याचा तपास व्हावा, अशी मागणी आपण उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे फौजदारी याचिकेद्वारे केली असल्याची माहिती लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक ॲड. वर्षा देशपांडे यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, या गुन्ह्यात आरोपी पोलीस अधिकारी असल्याने पोलीस वगळता स्वतंत्र आणि त्रयस्थ अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली चौकशी समितीने या गुन्ह्याचा तपास करावा.. मृत व्यक्ती अथवा त्याच्या कुटुंबियांच्या सन्मानाला बाधा येईल अशा पद्धतीने मृत व्यक्ती अथवा कुटुंबीयांची ओळख उघड होऊ नये याची काळजी घेतली जावी. काही वृत्तपत्रे, समाज माध्यमे अथवा पोलिसांकडून अशा पद्धतीचे वर्तन यापूर्वी झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, या तीन मागण्या आम्हीं कोल्हापूर खंडपीठाकडे केल्या आहेत.
फलटणच्या डॉक्टर युवतीने आत्महत्या केली. ही आत्महत्या कथित आहे. या संदर्भात डॉक्टर युवतीचे बंधू तसेच बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधू वरकटे ठोंबरे व मी आम्हीं तिघांनी मिळून फौजदारी स्वरूपाची याचिका
उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठांसमोर दाखल केली आहे. नुकतीच त्याची सुनावणी झाली. त्यात सरकारी वकीलांना कोर्टाने कडक शब्दात सुनावले आणि आदेशित केले की संबंधित तरुणीचा फोटो डोळ्यावर पट्टी बांधून सुद्धा, त्या कुटुंबाचे नाव किंवा तिच्या नातेवाईकांचे फोटो कोणत्याही प्रसार माध्यमांमध्ये आले असतील तर संबंधितांना तातडीने नोटीस देऊन ते काढून टाकण्यात यावेत.
याचिकाकर्त्यांच्या म्हणजे आमच्या वतीने ॲड गार्गी वारूंजीकर आणि ॲड सोनाली चव्हाण या महिला वकील म्हणून हजर झाल्या आहेत. ॲड नेहा देशपांडे या कोल्हापुर येथे या केसचे कामकाज पाहतात. याप्रकरणी आमच्या वतीने न्यायालयासमोर ॲड उदय आशा प्रकाश वारुंजीकर यांनी युक्तिवाद केला. याबाबत न्यायालयाकडून पुढील सुनावणी दरम्यान निर्णय अपेक्षित आहे
