थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) राज्य शासनाने आपल्या लोकप्रिय योजना अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज या बहुचर्चित मोहिमे अंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये ग्रामपंचायत थकबाकी घरपट्टीवर 50% सवलत देण्यासंदर्भात वटहुकूम काढल्यानंतर राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीने मासिक सभेमध्ये अशा प्रकारचे ठराव घेऊन नागरिकांना थकीत घरपट्टीवर 50% सवलतीचा प्रस्ताव पारित केला यामुळे नागरिकांना अडचणीच्या काळामध्ये खूप मोठा हातभार लागल्याची नागरिकांची बोलकी प्रतिक्रिया येत आहे. ही सवलत येत्या 31 डिसेंबर 2025 पर्यंतच लागू असल्याची माहिती सरपंच शीतल काकडे आणि ग्राम अधिकारी तुकाराम पाटील यांनी दिली.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस थेऊर ग्रामपंचायतीने अशा प्रकारच्या मासिक ठराव मंजूर केल्यानंतर ग्रामस्थांनी या सवलतीचा मोठ्या प्रमाणात फायदा घेऊन आपल्या थकबाकी 50% सवलत घेऊन घरपट्टी भरण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे यामधून ग्रामपंचायतचे गेल्या अनेक वर्षांपासून थकीत पडलेले येणे वसूल होण्यासाठी ही एक मोठी संधी असल्याने ग्रामपंचायतच्या माध्यमातून थकीत घरपट्टी धारक ग्रामस्थांना कळवून या सवलतीचा फायदा घेण्यासाठी उद्दीपित केले जात आहे.
पूर्व हवेलीतील बहुतेक सर्वच ग्रामपंचायत मध्ये याच प्रकारचे चित्र असून यामुळे ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे या मिळणाऱ्या उत्पन्नातून ग्रामविकास साधण्यासाठी मोठी मदत होणार आहे सध्या संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज मोहीम राबवली जात असून यामध्ये सर्वच ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवला आहे यातून वेगवेगळ्या प्रकारची विकास कामे तसेच सामाजिक उपक्रम हाती घेतली जात आहेत यात ग्रामस्थांचा ही सहभाग उल्लेखनीय असल्याचे दिसून येत आहे.
ही 50% सवलत केवळ थकीत घरपट्टीवर असून चालू वर्षाची संपूर्ण घरपट्टी भरल्यानंतरच या सवलतीचा फायदा ग्रामस्थांना घेता येणार आहे बऱ्याच ग्रामस्थांनी आपली थकीत घरपट्टी भरून येणे बाकी शून्य केल्याचे दिसून येत आहे.
