किरण खुडे

राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : राजगुरुनगर शहरात एका खाजगी शिकवणी वर्गात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने चाकूने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेला पुष्कर दिलीप शिंगाडे (वय १५) या विद्यार्थ्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर हल्ला करून मोटारसायकलवरून पसार झालेले दोन्ही अल्पवयीन हल्लेखोर विद्यार्थी खेड पोलीस ठाण्यात स्वतःहुन हजर झाले. सोमवारी (दि. १५) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेनंतर शहरात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. शहरातील वाडा रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळील एका खासगी शिकवणी वर्गात सकाळच्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही विद्यार्थी एकाच शाळेत शिकत असल्याची माहिती असून, किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.या घटनेत पुष्कर हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या गळ्यावर व पोटावर खोलवर वार झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच्या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि आरोपी विद्यार्थ्याने चाकूने शिक्षीकेसमोरच वर्गात पुष्करवर सपासप वार केल्याचे पोलीसांनी सांगितले.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी पुष्करला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

हल्ला करणारा विद्यार्थी आणि त्याचा एक साथीदार असे दोघेही अल्पवयीन आहेत, ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीसांनी सांगितले. दोन्ही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे, अशी माहिती खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिली.

या घटनेमुळे राजगुरुनगर शहरात शोककळा पसरली असून, शाळकरी मुलांमधील वाढता आक्रमकपणा आणि हिंसाचार हा गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी परिसरात सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची तसेच विद्यार्थ्यांमध्ये संवाद, समुपदेशन आणि जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पोलीस अधिक तपास करत असून घटनेमागील नेमके कारण लवकरच स्पष्ट होणार असल्याचे सांगितले. पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून संबंधीत ठीकाणी जाण्यास काही काळ नागरीकांना प्रतिबंध केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *