चाकण, ( हवेलीनामा प्रतिनिधी) :

परिसरातील वाढती वाहतूक आणि नियमभंगाच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन चाकण वाहतूक विभागाने विशेष दंडात्मक मोहीम राबवली. ही मोहिम चाकण वाहतूक विभाग , परिवहन अधिकारी ( मोशी ) यांच्या सहकार्याने संयुक्त पणे राबविण्यात आली. चाकण शहर व आसपासच्या प्रमुख मार्गांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत विविध वाहनांवर सुमारे ७० हजार रुपये दंड आकारण्यात आला. अशी माहिती परिवहन अधिकारी चौधरी यांनी दिली. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश वाघमारे उपस्थित होते.

या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियमभंगाच्या स्वरूपानुसार चालकांकडून दंड आकारण्यात आला. ही कारवाई प्रामुख्याने अनधिकृत फेरफार, परवाना आणि कागदपत्रांतील कमतरता, वेग मर्यादा भंग, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या बदलांविरुद्ध होती.

चाकण वाहतूक विभागाचे वरिष्ट पोलिस निरीक्षक निलेश वाघमारे यांनी सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे ही आमची जबाबदारी आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील. शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी अशी संयुक्त पावले भविष्यात अधिक कडक पद्धतीने उचलली जातील. येत्या काही दिवसात रिक्षांसह इतर वाहनांचीही कडक तपासणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर, बाजारपेठ परिसर आणि औद्योगिक वसाहतीतील गर्दीच्या मार्गांवर विशेष पथके तैनात करण्यात येणार असून, वाहतूक कोंडी व अनावश्यक धोकादायक वाहनचालकांवर अधिक कठोर नजर ठेवली जाणार आहे.

एकूणच, चाकण परिसरातील वाहतूक शिस्त राखण्यासाठी सुरू झालेली ही संयुक्त मोहीम नागरिकांकडून सकारात्मक पाऊल म्हणून पाहिली जात आहे. प्रशासनाने नियमभंग करणाऱ्यांना कडक इशारा दिला असून रस्त्यावर सुरक्षितता वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.

सदर कारवाई मध्ये व पोलिस उप निरीक्षक नामदेव गाडे , हितेश महानवर व सोबत बाळासाहेब जाधव पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *