किरण खुडे
राजगुरूनगर : (हवेलीनामा वृतसमूह) : येथील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत सरासरी ६८.८७ टक्के मतदान झाले. थंडीचा कडाका वाढला असल्याने सकाळी ९ नंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी काहीशी वाढली. दिवसभर मतदानाला मोठा उत्साह होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र शांततेत व उत्साही वातावरणात मतदान प्रक्रीया पार पडली.
राजगुरूनगर शहरात मतदारांची संख्या २५८०१ असुन जवळपास ९०० मतदारांची नावे दुबार आली आहेत. या संबंधित मतदारांकडुन याविषयी समंतीपत्र लिहुन घेण्यात आले. राजगुरुनगर शहरातील एकुण ७ ठिकाणी ३४ मतदान केंद्रावर मतदारांनी मतदान केले. मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवारांचे प्रतिनिधी, पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती. वाडा रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यालयात सर्वाधिक मतदान केंद्र असल्याने मतदान केंद्राबाहेर दिवसभर तेथे मोठी गर्दी होती.
सकाळी साडेअकरा वाजता १७.२४ टक्के मतदान झाले. दुपारी दीड वाजेपर्यंत ३७.८८ टक्के, साडेतीन वाजेपर्यत ५३.४४ टक्के, तर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी ६८.८७ टक्के मतदान झाले.
मतदान केंद्राजवळ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. मतदारांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी स्वयंसेवक, कार्यकर्ते व नगरपरिषद कर्मचारी मदत करत होते. दिव्यांग मतदारांना चाकाच्या खुर्चीवरून मतदान केंद्रावर नेण्याची व्यवस्था केली होती.
