चाकण (हवेलीनामा प्रतिनिधी) : चाकण नगरपरिषद निवडणूक प्रचाराने जोर धरला असून विविध पक्ष व अपक्ष उमेदवारांच्या प्रचार वाहनांवरील स्पीकरमधून होणाऱ्या कर्कश आवाजामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. व्यापारी, रुग्णालयातील रुग्ण, शाळांमधील विद्यार्थी यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे. त्यामुळे आवाजाची तीव्रता (डेसिबल) मर्यादित ठेवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.मतदानास अवघे तीन दिवस राहिल्याने सर्वच उमेदवारांनी प्रचाराची गती वाढवली आहे. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ, चौक व गर्दीच्या भागात स्पीकर लावून फिरणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र आवाजावर कोणतेही नियंत्रण नसल्याने काही ठिकाणी कानठळ्या बसवणारा ध्वनी निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने नागरिकांकडून होत आहेत.
स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, दिवसभर सुरू असलेल्या मोठ्या आवाजामुळे दुकानदार व ग्राहक दोघेही त्रस्त होत आहेत. रुग्णालय परिसरात वाढणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे रुग्णांच्या प्रकृतीवर परिणाम होत असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येत आहे.प्रचाराच्या आवाजामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित शाळांमध्ये अध्यापन सुरू असताना बाहेर चालणाऱ्या प्रचारमूलक आवाजामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत असून त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याची पालक व शिक्षकांकडून तक्रार नोंदवली जात आहे.ध्वनी प्रदूषणाबाबत तातडीने कारवाई करत डेसिबलची मर्यादा निश्चित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांनकडून होत आहे.पोलीस विभाग व निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचाराची गती वाढत असताना शहरातील शांतता आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याची भावना समाजातून व्यक्त करण्यात येत आहे.
