चाकण ( हवेलीनामा प्रतिनिधी ) समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या व आदर्श जीवन व्यतित करणाऱ्या महानुभवांचे स्मारक श्रद्धेचे केंद्र व्हावे असे मत आमदार श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केले.
वाजवणे ( ता.खेड ) येथे मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ संस्थापक स्व.महादू हावजी बच्चे व खेड तालुक्यात विशेषतः पश्चिम पट्ट्यातील वारकरी संप्रदायाचे प्रसारक स्व.भिकाजी बाबा बच्चे तथा वाजवणे बाबा यांच्या स्मारकांचे भूमीपूजन नुकतेच संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी
आमदार बाबाजी काळे , माजी जि.प.सदस्य अतुल देशमुख,माजी जि.प.सदस्य समिती सदस्य शरद बुट्टे पाटील,मुंबई डबेवाला संघटना अध्यक्ष उल्हास मुके,पुणे नाशिक महामार्ग समन्वयक इंजिनियर दिलीप मेदगे, नगरसेवक रवी लांडगे आदी उपस्थित होते.
,मुंबईत सरकारच्या वतीने लवकरच डबेवाल्यांना हक्काचे घर मिळेल.व अनेक वर्षांचे स्वप्न साकार होईल अशी माहिती भारतीय यांनी दिली. बाबाजी काळे यांनी दोन्ही स्मारकांच्या कामाला कोणतीही मदत लागली तर तत्काळ देऊ असे सांगितले.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पर्यटन विकासासाठी वांद्रे,कुंडेश्वर,गडदुबाई लेणी,शिंगेश्वर आदी ठिकाणे पक्क्या रस्त्याने जोडण्याची गरज असून या भागाकडे प्रधान्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली.
स्व.महादू हावजी बच्चे यांनी १३५ वर्षांपूर्वी १८९० मद्धे एका पारशी व्यक्तीला डबा पोहचवण्याचे काम सुरू केले.त्यांनतर हा व्यवसाय मोठा झाला व हजारो तरुणांना यातून रोजगार उपलब्ध झाला.अविरतपणे अचूक व वेळेत वितरण करणारे संघटन म्हणून जेवण डबेवाल्यांची ओळख आहे.प्रिन्स चार्ल्स व रिचर्ड ब्रॅन्सन यांसारख्या जागतिक नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेतल्याने या कामाची जगभर चर्चा झाली.आयआयटी कॉलेज व मॅनेजमेंट स्कुल आदि ठिकाणी डबेवाल्यांच्या कामाचे उदाहरण दिले जाते.
डबेवाल्यांचा इतिहास:
शतकीय परंपरेचा वारसा जपणारी मुंबई डबेवाला सेवा आज जगभर Zero Error Service( शून्य चूक सेवा ) म्हणून जगभर ओळखली जाते.स्व.महादू हावजी बच्चे यांनी स्थापन केलेल्या ‘मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ’ आणि ‘नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून डबेवाल्यांकडून धर्मशाळा, अन्नछत्र, रोटी बँक, पर्यावरण उपक्रम राबवले जातात.डबेवाल्यांच्या अद्वितीय कार्यपद्धतीला आजवर ७०० हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून त्यांच्या सेवेची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे.
