किरण खुडे
राजगुरूनगर (हवेलीनामा वृतसमूह) खेड तालुक्यातील लादवड गावाजवळ तरुणावर गोळीबार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. निवडणुकीच्या काळात जुने वाद उफाळून आले असून जुन्या हाणामारीच्या वादातून गोळीबार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. हि घटना लादवड येथील कोळेकरवस्ती येथे गुरुवारी (दि. २७) घडली. केतन श्यामराव कारले (वय २३) असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खेड पोलीसांनी संशयीत शुभम संतोष तांबे (वय २१) आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिली.
केतन कारले यांची पत्नी कुमकुम कारले (वय, २१) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार त्या आणि त्यांचे पती केतन गुरुवारी सकाळी खेड न्यायालयात एका खटल्याच्या तारखेसाठी घरून काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून (क्र.एम.एच. १४, के.वाय. ३७७०) निघाले होते. लादवडच्या कोळेकरवस्ती येथे पोहचल्यावर कुमकुम यांनी स्वच्छतागृहात जाण्यासाठी मोटारसायकल थांबविण्यास सांगितले. केतन यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि त्यांची पत्नी स्वच्छतागृहासाठी गेल्या. तेव्हाच दोन-तीन गोळ्यांच्या आवाजाने त्या घाबरून तेथून बाहेर आल्या. येऊन पाहिले असता, शुभम तांबे हा त्याच्या मोटारसायकलवर बसलेला होता आणि त्याच्या हातात पिस्तूल होते. त्याच्याबरोबर दोन अज्ञात व्यक्ती होत्या, ज्या केतन यांच्या दुचाकीवर बसल्या होत्या. तर केतन हे खाली रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
कुमकुम यांनी आरडाओरड केली, तेव्हा शुभम आणि त्याचे साथीदार केतन यांची मोटारसायकल घेऊन पळून गेले. त्यांनी लगेच सासूबाईंना फोन केला. त्या घटनास्थळी पोहचल्या आणि दोघींनी एका पिकअप गाडीच्या मदतीने केतन यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
हे प्रकरण जुन्या वादाशी आणि न्यायालयीन खटल्याशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. कुमकुम यांच्या सांगण्यानुसार, केतन यांचे शुभम तांबे आणि अंकुर रमेश कारले (वय २३) यांच्याशी पूर्वीचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते. सन २०२२ मध्ये कुमकुम आणि केतन यांचे लग्न झाले. लग्नानंतर अंकुरने केतन यांना धमक्या दिल्या होत्या. नोव्हेंबर २०२३ मध्ये दिवाळीच्या वेळी चांदुस (ता.खेड) येथे अंकुरने शुभम तांबेवर गोळीबार केला होता, ज्यात शुभम जखमी झाला होता.
याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. केतन याला त्यावेळी अटक झाली होती, पण दोन महिन्यांनी जामिनावर सुटका झाली. यानंतर न्यायालयीन तारखांना येताना केतन याला अनेकदा शुभमकडून धमक्या मिळत होत्या. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, अज्ञात आरोपींना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शुभम तांबे आणि त्याचे साथीदार फरार आहेत. खेड परिसरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
