किरण खुडे

राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे एका साडेचार वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले आहे. या बालकाचे नाव देवांश योगेश गव्हाणे आहे.

तालुक्याच्या पूर्व भागातील निमगाव येथील भगतवस्ती येथे मंगळवारी (दि. २५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास देवांश घराबाहेर खेळत होता. यावेळी त्याच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्या मानेला धरून शंभर फुट ओढत नेले.

दरम्यान, देवांशची आई घराबाहेर आली आणि जोरजोराने ओरडायला लागली. तिच्या आवाजामुळे बिबट्या भेदरला आणि तो देवांशला सोडून पळून गेला. बालकाच्या मानेला बिबट्याचे दात लागून जखम झाली आहे. त्याला उपचारासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.

खेड तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन महिन्यांपासून वाफगाव, गुळाणी, निमगाव, दावडी, रेटवडी या परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून अनेकांच्या घराजवळून कोंबड्या, कुत्रे, बकऱ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. या परिसरात दिवसाढवळ्याही सहज बिबट्याचे दर्शन होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *