किरण खुडे
राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने तालुक्याच्या शैक्षणिक जडणघडणीमध्ये उल्लेखनीय योगदान दिले असून संस्थेने पारंपरिक शिक्षणाबरोबर अभियांत्रिकी व एमबीए महाविद्यालय सुरू केल्याने विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणाची संधी निर्माण केली आहे. तालुकास्तरावर मुख्याध्यापक संघाने संस्थेने केलेल्या या शैक्षणिक संधीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी केले.
ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित मुख्याध्यापक सन्मान सोहळा व सहविचार सभेत बोलत होते. या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, संस्थाध्यक्ष ॲड.देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, सुरेश टाकळकर, अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल बांदल, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय बोरकर, प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, डॉ. एच.एम.जरे, उपप्राचार्य प्रा. विठ्ठल दौंडकर, प्रा.एस.टी.फुंदे उपस्थित होते. या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर पुढे म्हणाले की, संस्थेने सामाजिक बांधिलकी जपणारे विद्यार्थी घडवले आहेत. संस्थेचे शैक्षणिक वातावरण कौतुकास्पद असून संस्था व्यावसायिक शिक्षणाचे केंद्र बनावे अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता व सुरक्षितता यासाठी मुख्याध्यापकांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
संस्था उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर म्हणाले की, खेड तालुक्यातील उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ देण्याच्या दृष्टीने संस्थेने संगणक शिक्षणाबरोबर अभियांत्रिकी शिक्षण सुरू केले आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा लाभ होण्यासाठी मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावा.
संस्थाध्यक्ष ॲड.देवेंद्र बुट्टे पाटील यांनी प्रास्ताविकात सर्व मुख्याध्यापकांचे स्वागत केले. गेली ५० वर्ष संस्था विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करीत आहे, असे सांगून संस्थेने सुरू केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्याध्यापक संघाने सहकार्य करावे असे आवाहन केले.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. विठ्ठल बांदल, संजय बोरकर, उत्तम पोटवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रा. शिल्पा टाकळकर यांनी तर आभार प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे यांनी मानले.
