पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) कोर्टाकडून जप्तीचे वॉरंट बजावण्यासाठी वाघोली पोलीस स्टेशन मधील हवालदाराने तक्रारदाराकडे पाच हजाराची लाच मागितली याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळा कारवाईत हवालदार एसीबीच्या जाळ्यात अडकला.
लोकसेवक परमेश्वर मानिक पाखरे, वय 37 वर्षे, पद- पोलीस हवालदार ब.नं. 7827, नेमणुक-वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर मूळ पत्ता – गणेश नगर, मदर मेरी सोसायटी जवळ, आव्हाळवाडी रोड, वाघोली, पुणे असे कारवाई करण्यात आलेल्या हवालदाराचे नावं आहे.
लांचालूचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, तक्रारदार यांचे पतीसोबत पटत नसल्याने सन 2015 मध्ये पोटगी मिळण्यासाठी विटा न्यायालयात दावा दाखल केला होता. त्या दाव्यामध्ये ऑक्टोबर 2024 मध्ये न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देऊन सन 2015 पासून प्रति महिना 5000 अशी पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु तक्रारदाराच्या पतीने पोटगी दिली नसल्याने तक्रारदाराने पुन्हा संबंधित कोर्टात अर्ज दाखल केला असता तक्रारदाराच्या पतीच्या नावाने त्याचेकडे थकीत पोटगीची रक्कम 6,65,000/- ही वसुली करण्यासाठी जप्ती व विक्री चे वॉरंट न्यायालयाने जारी केले.हे वॉरंट तक्रारदाराने स्वतः वाघोली पोलीस ठाण्यात आणून दिले असता यातील लोकसेवक पोलीस हवालदार पाखरे यांनी वारंट बजावून रिपोर्ट देण्यासाठी तक्रारदाराकडे 5,000/- रुपये लाचेची वारंवार मागणी करून लाच न दिल्यास वॉरंट बजावण्यात येणार नसल्याचे सांगितल्याची तक्रार तक्रारदार यांनी 24/11/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती. दि. 25/11/2025 रोजी वाघोली पोलीस ठाण्याचे आवारात पडताळणी केली असता, लोकसेवक पोलीस हवालदार पाखरे यांनी तक्रारदारांचे विटा कोर्टाने तक्रारदार यांच्या पतीच्या नावाने काढलेले रक्कम रू.6,65,000/- चे वसुली करण्यासाठीचे रिकव्हरी वॉरंटची बजावून रिपोर्ट देण्याकरीता 5,000/- रुपयाच्या लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान 12:09 वा. वाघोली पोलीस ठाण्याचे समोर पुणे अहिल्यानगर महामार्गावरील चहाच्या टपरीवर येथे तक्रारदाराकडून 5,000/- रुपयाची लाच पंचासमक्ष स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध वाघोली पोलीस ठाणे, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
