दौड (हवेलीनामा प्रतिनिधी प्रवीण कांबळे) मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे राहू येथे आयोजन करण्यात आले. कैलास विद्या मंदिर मैदानात हा कार्यक्रम पार पडला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राहुल कुल होते.

कार्यक्रमात ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी मार्गदर्शन केले, कीर्तनातून ग्रामविकास, स्वच्छता, पारदर्शकता, सामूहिक सहभाग आणि पंचायतराज व्यवस्थेची गरज यावर प्रभावी संदेश देण्यात आला. सामाजिक बांधिलकी आणि नैतिक मूल्यांवर आधारित कीर्तनाने श्रोत्यांचे प्रबोधन झाले.

हा राज्य शासनाचा बहूउद्देशीय उपक्रम असून पंचायत राज संस्थांची कार्यक्षमता वाढवणे, नागरीकांचा सहभाग वाढवणे, तसेच शासकीय योजना प्रभावीपणे प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली.स्थानिक प्रतिनिधी व अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतकारभारातील पारदर्शकता, जबाबदारी, शासकीय योजनांचा लाभ आणि ग्रामविकासासाठी नागरिकांनी करावयाची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध शंकानिरसन सत्रही घेण्यात आले.

राहू परिसरात या कार्यक्रमामुळे ग्रामविकासाबाबत जनजागृती वाढली असून नागरिकांमध्ये सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. स्थानिकांनी दिलेल्या प्रतिसादावरून या अभियानाची परिणामकारकता प्रकर्षाने जाणवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *