पुणे (हवेलीनामा वृतसमूह) जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिष्ठा असलेल्या आणि नेहमीच चर्चेत राहणाऱ्या हवेली तालुक्याच्या तहसीलदारपदी अर्चना निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव मनिषा जायभाये यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. विद्यमान तहसीलदार किरण सुरवसे यांची पदोन्नती होऊन त्यांची सोलापूर येथे बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते.

आर्चना निकम या यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक शाखेत कार्यरत होत्या. त्याआधी पिंपरी–चिंचवड येथील अप्पर तहसीलदार कार्यालयात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. प्रशासनातील अनुभव आणि काटेकोर कार्यशैली यासाठी त्यांची ओळख आहे.

हवेली तालुका हा महसूल विभागातील सर्वात संवेदनशील आणि मलाईदार तालुका मानला जातो. जमीन व्यवहार, लँड लिटिगेशन आणि अलीकडच्या काळात राज्यभर चर्चेत असलेले अनेक घोटाळे हे हवेलीशी संबंधित असल्याने येथील कामकाज नेहमीच आव्हानात्मक मानले जाते. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांच्याही नजरा हवेली महसूल विभागावर असतात. त्यामुळे निकम यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्यावर काटेकोर, पारदर्शक आणि दक्ष प्रशासनाची मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे.

तहसीलदार अर्चना निकम यांच्या वर्णीबद्दल हवेली तालुक्यातून तसेच प्रशासकीय वर्तुळातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. नवीन तहसीलदारांकडून तालुक्यातील महसूल कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *