पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी पीडित डॉक्टरने तिच्या हातावर आत्महत्येचे कारण लिहिले असल्याचे समोर आले असून, त्यात पोलीस दलातील एका अधिकाऱ्यासह आणखी एक खाजगी व्यक्ती यांनी लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप केले. यामुळे संपूर्ण जिल्हातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घेतली आहे. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले असून, आरोपींवर कठोर कारवाई करा अशा सूचना दिल्या. यानंतर पोलिसांकडून गोपाळ बदानेस तत्काळ निलंबन करण्यात आले.
सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले की, आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे. यात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदाने व दुसरा प्रशांत बनकर आहे. तो पोलीस नसून तो सामान्य नागरिक आहे.या दोघांना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. आरोपींना तात्काळ अटक करायची आणि जी काही कारवाई आहे ती करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *