पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना नवीन महाविद्यालयास परवानगी देताना ३ एकर अकृषक जमिनीच्या एवजी एक एकर एवढी मर्यादा असावी तर बांधकामासाठी २१ हजार चौ फूट ऐवजी १० हजार चौ फूट मर्यादा करण्यात यावी अशी मागणी करत एक निवेदन दिले.
भविष्यात शहराचे विस्तारीकरण होत राहिल्याने जागेचा प्रश्न गंभीर होणार आहे थोड्या जागेवर इमारतीचे बांधकाम करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे यासाठी भविष्यकालीन अडचणींचा विचार करून आपण नवीन महाविद्यालय चालू करण्यातील अटी शिथिल करण्यासाठी नक्कीच सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा असे आमदार पवार यांनी निवेदन दिल्यावर सांगितले.ते सध्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या प्रमुख पदी काम करत आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने घालून दिलेल्या अटी नियम लागू करून परंतु पुरविण्यात येणाऱ्या सुविधा वर्ग खोल्या, क्रीडांगण, प्रयोगशाळा, ग्रंथालय, जिमखाना आदी सुविधा टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करण्यास परवानगी दिली तर ग्रामीण भागात अनेक महाविद्यालये तयार होतील आणि शिक्षणाची सोय उपलब्ध होईल असे त्यात म्हटले आहे.
