पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) जिल्हाधिकारी कार्यालय येथे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाय योजनांसह मतदार जनजागृती मोहिमेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेद्र भोसले, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, निवडणूक निरीक्षक मानवेश सिंह सिद्धू, ललीत कुमार, भीम सिंह, अरुंधती सरकार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मतदारांना, पाणी, व्हीलचेअर, बसण्याकरीता बाकडे, मंडपाची व्यवस्था, स्वच्छतागृह, वाहनतळ आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सुविधांची माहिती मतदारांना होण्याकरीता व्यापक जनजागृती करा. मतदारांकरीता वाहनतळांची सुविधा करण्यात आली असून त्याबाबत सूक्ष्म नियोजन करून माहिती मतदारांपर्यंत पोहचवावी. याबाबबत पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी त्यांच्या संकेतस्थळ, मोबाइल ॲप, एफएम स्टेशन तसेच मनपाच्या समाजमाध्यमाद्वारे जनजागृती करावी.
मतदारांना मतदान करताना कसलाच अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. निवडणूक निरीक्षक सिंह म्हणाले, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भारतीय सैन्यदलाचे दक्षिण मुख्यालय तसेच अन्य आस्थापना आहेत, त्यांच्याशी संपर्क करून मतदान करण्याबाबत आवाहन करावे. मतदान केंद्रावरील गर्दी टाळण्याकरीता पुरुष व महिला अशा रांगा करण्यात याव्यात. मतदान केंद्रावर आवश्यकतेप्रमाणे स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. मतदान केंद्रावरील शौचालयाची साफसफाई करावी, असेही ते म्हणाले.
“मतदान केंद्रावर गर्दी टाळण्यासोबत उंचीवर दिशादर्शक फलक (सायनेज) तसेच प्रतिक्षालयाची व्यवस्था करावी. मतदारांच्या वाहनांकरीता असलेल्या वाहनतळाची माहिती मतदारांपर्यत पोहचवावी. मतदान केंद्रावर पाण्याची व्यवस्था करावी. मतदान केंद्रावरील सुविधेबाबत पत्रकार परिषद घेवून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती द्यावी.” – मानवेश सिंह सिद्धू, निवडणूक निरीक्षक
