पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) सोलापूर येथील तुरुंगातून बार्शी सत्र न्यायालयात हजर करण्यासाठी आणलेल्या पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेल्या गुन्हेगारास कुंजीरवाडीतून स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून लोणी-काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून याची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी, गेली सहा महिन्यांपासून सोलापूर तुरुंगात असलेला गुन्हेगार शिवाजी महादेव पेटाडे वय 28 रा.उंबरे पागे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यास बार्शी सेशन कोर्टात हजर करत असताना पोलिसांच्या ताब्यातून तो पळून गेला होता अशा आशयाची तक्रार सोलापूर ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या बार्शी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 891/2024 बीएनएस कलम 262 नुसार पोलीस स्टेशन दिनांक 21/ 10 /2024 रोजी दाखल असून हा फरारी गुन्हेगाराबाबतची गुप्त माहिती प्राप्त झाल्यानंतर लोणी-काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली थेऊर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस हवालदार विजय जाधव, पोलीस शिपाई राहुल कर्डिले, प्रशांत सुतार, तोफिक सय्यद तसेच कुंजीरवाडीचे माजी तंटामुक्त अध्यक्ष बापूसाहेब घुले,विनोद सावंत आणि सार्थक मोटे या स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून या गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले. त्यानंतर लोणी-काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांना याची माहिती दिली.
याबाबत टेंभुर्णी व बार्शी पोलीस स्टेशन चे तपासी अधिकारी यांना कळविण्यात आले असून गुन्हेगारास ताब्यात घेण्याकरिता बार्शी पोलीस स्टेशन पथकास यांना लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे येण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे,पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे,पोलीस हवालदार विजय जाधव, पोलीस शिपाई राहुल कर्डिले, प्रशांत सुतार, तोफिक सय्यद,पोलीस मित्र संतोष गायकवाड, राहुल गायकवाड,संतोष ओव्हाळ, सागर बोडरे यांनी केलेली आहे.
