पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) आंबेगाव तालुक्यातील घोडेगांव येथील मंडल अधिकारी श्रीधर आचारी याने फेरफार नामंजुर करण्यासाठी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी करुन पंचासमक्ष पाच हजार रुपये स्विकारल्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून त्यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यासोबत खाजगी इसम निशांत लोहकरे यास प्रोत्साहन दिल्याबद्दल दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंध विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, तक्रारदार यांनी दि. ०७/०३/२०२४ रोजी तलाठी गिरवली, ता. आंबेगाव, जि. पुणे यांचेकडे फेरफार नामंजुर होणेबाबत तसेच त्याच्या मंजुरीला हरकत असल्याचा अर्ज दिला होता. या अर्जाची सुनावणी घोडेगांवचे मंडल अधिकारी लोकसेवक श्रीधर आचारी यांचेकडे सुरु होती. त्याबाबत तक्रारदार हे लोकसेवक श्रीधर आचारी यांना भेटले असता, त्यांनी त्यांचे कार्यालयात काम करणारे खाजगी इसम निशांत लोहकरे यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार निशांत लोहकरे यांना भेटले असता त्यांनी फेरफार नामंजुर होणेकरीता लोकसेवक श्रीधर आचारी मागतील त्याप्रमाणे पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार श्रीधर आचारी यांना भेटले असता त्यांनी फेरफार नामंजुर करण्यासाठी १०,०००/- रुपयाची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे येथे केली होती.या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता मंडलाधिकारी आचारी यांनी हे काम करणेकरीता पंचासमक्ष तडजोडीअंती ५,०००/- रुपयांची लाच मागणी करुन ती रक्कम पंचासमक्ष स्विकारली व खाजगी इसम निशांत लोहकरे यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम देणेबाबत प्रोत्साहन दिले म्हणून त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध घोडेगांव पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे येथील पोलीस निरीक्षक रुपेश जाधव तपास करत आहेत.
