पुणे (हवेलीनामा विषेशवृत्त) विधानसभेच्या निवडणुकीचा कालावधी जसजसा जवळ येत आहे त्याप्रमाणात राजकीय उलथापालथ होण्यास सुरुवात झाली असून प्रत्येक उमेदवार आपला सुरक्षित मतदारसंघ शोधत आहेत.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण बारामती देऊ त्या उमेदवाराचे काम मन लावून करा असे भावनिक आवाहन केल्यानंतर मग दादा नक्की कुठून निवडणुक लढवणार याचे तर्कवितर्क सुरु झाले.बारामतीच्या सर्वांगीण विकासामध्ये अजित पवार यांचे योगदान काय हे बारामतीकरांनाच माहीत आहे.त्यामुळेच शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून दादांनी निवडणुक लढवावी असा सूर या मतदारसंघातील सर्व पक्षीय युवा वर्गाकडून होत आहे.

अजित पवार हे हवेली तालुक्यातील युवकांचे प्रेरणास्थान आहेत. गेल्या अनेक निवडणुकीत दादांच्या प्रत्येक शब्द तळहातावर उचलणारा युवा या मतदारसंघात आहे.आज या मतदारसंघाचे नेतृत्व शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार करीत असून येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा तेच प्रबळ दावेदार आहेत. त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी माजी आमदार बाबुराव पाचर्णे हयात नाहीत त्यामुळे भाजपकडून उमेदवार कोण असेल याबद्दल आजपर्यंत काहीच अंदाज येत नाहीत.

आतापर्यंत हवेलीतून आमदारकीची लाॅटरी कोणासही लागलेली नाही अशावेळी गेल्या काही दिवसांपासून ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी आमदारकीची लढाई लढण्याच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे.शिरूर तालुक्यातील गावागावात जाऊन मतदारांपर्यंत पोहोचून आपली भूमिका स्पष्ट केली आहे तर हवेलीतील गावागावात आपले कार्यकर्ते तयार करून प्रमुख दावेदार म्हणून समोर येत आहेत.

महायुतीला प्रत्येक मतदारसंघ जर जिंकून आणायचा असेल तर त्याठिकाणची ताकद कोणत्या मित्र पक्षाकडे आहे याची चाचपणी करुन प्रबळ उमेदवार द्यावा लागेल. शिरूर हवेली मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार जर निवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले तर या मतदारसंघ सर्व गणितं बदलून जातील यात शंका नाही.

बारामतीतील दादांच्या भाषणानंतर हवेलीतून दादांना साद घातली जातेय की दादा आपण आमचे नेतृत्व करावे आमचाही बारामतीप्रमाणे कायापालट झालेला पहायचा आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *