पुणे- (हवेलीनामा वृत्तसमूह ) महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणे जिल्हा शाखा पालघर ( बोर्डी ) येथे आयोजित ४२ व्या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेत आर्मी पब्लिक स्कूल, देहुरोड शाळेतील कलाशिक्षिका लीना गणेश आढाव यांना
“राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार” मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
लीना गणेश आढाव या गेली.१५ वर्ष आर्मी पब्लिक स्कूल, देहुरोड, पुणे येथे कलाशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कलाध्यापनातून असंख्य विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले व कलासाधना करण्यास प्रेरित केले. त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले पुढील करियर कलेचेच निवडावे यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व त्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही केले. कलाअध्यापनात व तत्संबंधित अनेक उपक्रमात त्या कायमच हिरिरीने भाग घेऊन अग्रेसर असतात. त्या संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये पुढाकार घेऊन सहभागी होतात.
त्यांना हा पुरस्कार
संघटनेप्रती असलेली निष्ठा,समर्पण,संघटनेसाठी दिलेले योगदान, तसेच प्रशालेत तन-मन-धन अर्पण करून कला विषयाला मिळवून दिलेली प्रतिष्ठा, विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विविध उपक्रम इत्यादी गोष्टींचा विचार करून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचे अध्यक्ष नरेंद्र बारई, पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा अश्विनी कदम, यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार यावेळी देण्यात आला.
आढाव यांच्या यशाबद्दल पुणे जिल्ह्यातील सर्व कला अध्यापकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या कलाक्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीबद्दल व मिळालेल्या राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
