पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) शिरूर घोडनदी पात्रात मिळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटवून, खुनाचे गुन्ह्याचा केला उलगडा, तीन आरोपी जेरबंद करणेत स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस स्टेशनला मिळाले यश.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ जानेवारीला शिरूर गावचे हद्दीत पाचर्णे मळा येथे घोडनदी पात्रात रामभाऊ पाचर्णे याचे शेताजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह हातपाय बांधलेल्या स्थितीत मिळून आला होता. मयतास मारहाण करून त्याचे हातपाय बांधून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने नदीत टाकून देवून त्याचा खून केला असलेबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयताचे तपासादरम्यान खुनाचा गुन्हा नोंदविणेत आला होता.घडलेल्या प्रकार गंभीर असल्याने पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याचे सुचना दिल्या. मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते व मयतास मारहाण करण्यात आली होती, त्यामुळे हा खून असल्याचे निष्पन्न करणेत आले होते. मृतदेह नदीपात्रात पाण्यात मिळून आल्याने चेहरा ओळख पटविणे अडचणीचे होते, पथकाने तपासाची चक्रे फिरवत मृतदेहाची ओळख पटवून त्याचे नाव कृष्णा गोकूळ विघ्ने, वय ३२ वर्षे, रा. आनंदगाव, शिरूर कासार ता. शिरूर कासार, जि. बीड असे असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

मृतदेह मिळून आलेल्या ठिकाणापासून लगतच्या रस्त्याचे दोन्ही बाजूकडील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली मयत कृष्णा गोकूळ विघ्ने याचा खून त्याचा भाऊ १) अजिनाथ गोकूळ विघ्ने, वय २६ वर्षे, त्यांचा चलुता  २) पांडुरंग अर्जुन विघ्ने, वय ५० वर्षे, दोघे रा. आनंद गाव, शिरूर कासार, ता. शिरूर कासार, जि.बीड, ३) गणेश प्रभाकर नागरगोजे, वय २९ वर्षे रा. एवलवाडी, ता. पाटोदा, जि.बीड यांनी केला असल्याची माहिती मिळाली तपास पथकांनी बीड येथे आपला मोर्चा वळवून वरील इसमांना शिरूर कासार परीसरातून ताब्यात घेतले.असता तीनही इसमांकडे चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले असून मयत कृष्णा गोकूळ विघ्ने हा व्यसनी होता, तो कुटुंबात नेहमी जमीन विक्री करा असे म्हणून भांडण करत होता त्यामुळे आरोपींनी त्यास चारचाकी वाहन महिंद्रा जितो टेम्पो नं. एम. एच. १६ सी. डी. ३६८४ मध्ये आणून त्याचे हातपाय बांधून त्यास शिरूर शहरालगतचे घोडनदी पात्रात टाकून देण्यात आले व त्याचा खून करणेत आला असल्याचे  तपासात निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक पंकज देशमूख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, अतुल डेरे, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे तसेच शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार अरूण उबाळे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, विकी यादव, सचिन भोई, संतोष साळुंखे यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक यादव हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *