पुणे- (हवेलीनामा वृत्तसमूह) अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर येथील चिंतामणी मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी  श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी महेश आगलावे यांनी श्रींची विधिवत पूजा केली. यावेळी चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली. देवस्थान व आगलावे बंधूंतर्फे मंदिर प्रांगणात मांडव घालण्यात आले होते, दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि अक्षय ब्लड सेंटर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्याला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. पुणे शहर उपायुक्त रुख्मिणी गलांडे  यांनी मंदिराला भेट दिली.यावेळी सायकलने अष्टविनायक दर्शन करणार्‍या भाविकांनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवला होता. गलांडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.  देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली. दिवसभर भाविकांची गर्दी कमी जास्त होत होती. सायंकाळी दर्शनाला येणार्‍या भक्तांची गर्दी वाढली.  चिंतामणी भजनी मंडळी यांची साथीने ह.भ.प. निर्मलनाथ महाराज ( आळंदी देवाची ) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले, चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना निघला त्यांनतर उपस्थित भाविकांना  महाप्रसाद देण्यात आला. ग्रामपंचायती तर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.मंदिरात दिवसभर चिंचवड देवस्थानचे विश्वस्त केशव उमेश विद्वांस लक्ष ठेवून होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *