पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) शेतातील मोटर बंद करण्यासाठी गेलेल्या एका ३५ वर्षीय शेतकऱ्याला नागाने दंश केल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी (ता. २८) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. चित्रसेन पांडुरंग जवळकर (वय -३५, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) असे त्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चित्रसेन जवळकर हे आळंदी म्हातोबा येथील श्री म्हातोबा जोगेश्वरी नवरात्र उत्सव कमिटीचे अध्यक्ष होते. गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शेतातील मोटर बंद करण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक त्यांना नागाने दंश केला. त्यामुळे ते ओरडले. त्यांचा आवाज ऐकून लोकवस्तीतील नागरिकांनी तात्काळ त्या ठिकाणी हजर झाले. तोपर्यंत चित्रसेन हे घाबरून बेशुद्ध पडले होते. त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी रिक्षातून लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच आळंदी म्हातोबाची परीसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेने आळंदी म्हातोबाचीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत शांत, संयमी, हसतमुख असलेल्या चित्रसेन यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *