पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्या सोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे. विजेची मागणी सातत्याने वाढत जाणार आहे. मात्र सर्व वर्गवारीतील ग्राहकांचे वीज दर नियंत्रणात व कमी करण्यासाठी ही योजना आदर्श ठरेल असे मत कर्नाटक राज्यातील विविध वीज कंपन्यांच्या प्रमुखांनी पुणे येथील अभ्यास दौऱ्यात व्यक्त केला.

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सौर कृषिपंप व मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनांची अंमलबजावणी व पाहणीसाठी कर्नाटक राज्याच्या ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव . गौरव गुप्ता, कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक  पंकज कुमार पाण्डेय, हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद रोशन, मंगरूळू इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती डी. पद्मावती यांनी बुधवारी (दि. ४) व गुरूवारी (दि. ५) मावळ व खेड तालुक्यातील कृषी सौर ऊर्जा प्रकल्पांची पाहणी केली व लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक  अंकुश नाळे, मुख्य अभियंता  राजेंद्र पवार, महाऊर्जाचे प्रादेशिक संचालक पंकज तगलपल्लेवार आदींची उपस्थिती होती.

कर्नाटकमधील ऊर्जा विभागाच्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचे लाभार्थी कुरकुंडी (ता. खेड) येथील  बाजीराव पाचर्णे आणि बेलज (ता. मावळ) येथील श्री. बाळू ज्ञानू मोरमारे यांच्या शेतात जाऊन पाच एचपी क्षमतेच्या सौर कृषिपंपाची पाहणी केली. या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. ‘सौर’वरील वीजपुरवठ्यामुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती प्रत्यक्ष जाणून घेतली. यानंतर महावितरणच्या पाईट (ता. खेड) येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या परिसरातील एक मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. सन २०१९ मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. तसेच गणेशखिंड येथील महावितरणच्या लघु प्रशिक्षण केंद्रांची देखील या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

यानंतर झालेल्या चर्चात्मक बैठकीमध्ये, महाराष्ट्राने २०२५ पर्यंत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ मधून ७ हजार मेगावॅट सौर वीजनिर्मितीचे उदिदष्ट ठेवले आहे व राज्यातील ३० टक्के कृषी वीजवाहिन्यांद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत वीजपुरवठा होईल. वीजखरेदीचा खर्च कमी होईल. त्यामुळे क्रॉस सबसिडीचा मोठा भार कमी होणार असल्याने औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांचे वीज दर देखील कमी होणार आहेत अशी माहिती मुख्य अभियंता पवार यांनी दिली. यावेळी महावितरणच्या विविध योजना व मुद्द्यांवर चर्चा झाली.

या अभ्यास दौऱ्यात महावितरणच्या पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता युवराज जरग व  संजीव नेहेते (स्थापत्य), कार्यकारी अभियंता . राजेंद्र येडके व विजेंद्र मुळे, अभ्यास दौऱ्याचे समन्वयक डॉ. संतोष पाटणी आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *