पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] शरीराचा आणि देशाचा तसेच राज्याचा विकास होत असताना या असंघटित गॅस एजन्सी कामगारांचे त्यातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. मात्र ते स्वतःच्या विकासाच्या लाभापासून वंचित राहतात त्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावून शहरातील किंवा देशातील विकासात त्याचाही समावेश होण्यासाठी आणि त्यांनाही नागरिक म्हणून जगता यावे यासाठी सर्वच घटक तसेच तेल कंपनी किंवा यंत्रणांकडून संघटितपणे प्रयत्न होणे गरजेचे आहे त्याशिवाय गॅस एजन्सी कामगारांना न्याय मिळणार नाही
देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचा वाटा असणारे देशात सर्व शहरात किंवा अगदी खेड्या-पाड्यात , वाड्या वस्त्यावर, छोट्या- मोठ्या गावात , शहरात, लोकांच्या घरोघरी सिलेंडर डिलिव्हरी करून हातावर पोट असणारे असे हे संपूर्ण देशभरात असंघटतीत असे सुमारे ८० ते ९० लाख किंवा १ कोटी पेक्षा कमी नसणारे गॅस एजन्सी कामगार आहेत. गॅस एजन्सी मध्ये काम करत असताना कित्येक कामगारांची एक पिढी संपून दुसरी पिढी सध्या काम करत आहे तर काही ठिकाणी त्यांची तिसरी पिढी सध्या गॅस कामगार म्हणून काम करत आहे. १९८० च्या दशकात बहुतांशी भागात गॅस एजन्सी चालु झाल्या आणि तेव्हापासून आज तागायात कसलाही संप न करता, कोरोनाच्या काळात देखील मृत्यु समोर असताना कोरोना होईल याची तमा न बाळगता जेवढी घेता येईल तेवढी काळजी घेऊन न डगमगता अत्यावश्यक सेवा म्हणुन त्यांनी हे काम अविरत पणे चालु ठेवले होते, असा हा गॅस एजन्सी कामगार हा बहुतांशी राजस्थान राज्यातील बिश्नोई तसेच मारवाडी, राजपूत जातीतील जास्त प्रमाणात भारताच्या पश्चिम भागात किंवा दक्षिण भागात आणि उत्तर व मध्य भागात देखील काम करताना आढळतो. सोबतच त्या-त्या राज्यातील देखील कामगार वर्ग त्या-त्या राज्यात गॅस एजन्सी कामगार म्हणून काम करतो, तसेच गॅस मेकॅनिक सुद्धा गॅस कामगार मधील एक घटक आहे, गॅस एजन्सी ऑफिस कामगार सुद्धा एक घटक आहे, या कामगारांसह मजूर, हातगाडी धारक, शेतमजूर, घरेलू कामगार, पेट्रोल पंप कामगार, गॅस सिलेंडर ट्रक वाहतूक करणारे ड्रायव्हर, डिझेल-पेट्रोल टँकर वाहतूक करणारी ड्रायव्हर, स्विगी आणि झोमॅटो चे डिलिव्हरी बॉय, असे सर्व आणि अजून बरेच असंघटित कामगार सध्या देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी सेवा देत आहेत यासाठी आतापर्यंत कोणी बोलत नाही म्हणून आम्ही आमच्या माध्यमातून यांच्यासाठी राष्ट्रिय गॅस एजन्सी कामगार संघटना ही उभी करत आहोत.
आरोग्याच्या असंख्य तक्रारी
भारतीय राज्यघटनेने कामाला आणि सामाजिक सुरक्षेला आधार दिला आहे दिवसभर राब-राब राबायचे, सिलेंडरचे प्लांट मधून भरलेल्या सिलेंडर चे ट्रक आल्यानंतर हमाली करून ते सिलेंडर उचलून गोडाऊन मध्ये टाकायचे, तिथून पुढे आपले टेम्पो किंवा सायकलवर सिलेंडर घ्यायचे आणि ग्राहकांना वेळेत सिलेंडर देण्यासाठी जायचे पण कामाच्या वेळा निश्चित नसतात किती काम करायचे याचे ही काही बंधन नसते, सिलेंडर हातात आहेत आणि ग्राहकांनी बुकींग केलेले सिलेंडर ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचवायचे आहेत इतकेच डोक्यात असते आणि त्यासाठी कीतीही वेळ लागला तरी ते काम त्यांच्या साठी प्रथमच. तसेच गॅस मेकॅनिक ला सुद्धा याच प्रकारे आपले काम पुर्ण करावे लागते. पोटाला दोन वेळचे अन्न मिळविण्यासाठी व आपला संसार तोडका मोडका चालवण्यासाठी गॅस कामगार हे निमुटपणे हे सर्व सहन करत असतात आणि ग्राहकांना लोकांना वेळेवर सिलेंडर देऊन त्यांचे घरचे जेवण बनण्यासाठी हे वेळेवर लोकांच्या घरी सिलेंडर घेऊन पोहचत असतात, शरीराला कितीही त्रास झाला तरी हे 30 ते 40 किलो वजनाचे सिलेंडर त्यांना उचलावे लागतात, असे इतके वजन घेऊन कित्तेक मजले सिलेंडर खांद्यावर घेऊन त्यांना वरती बिल्डिंग मध्ये चढावे लागते कधी कधी तर इतकी निराशा होते की वरती साहव्या – सातव्या – आठव्या मजल्यावर पायऱ्यांनी चालत गेल्यावर ग्राहकाचे घर बंद असते, त्यांचा कॉल सुद्धा लागत नाही अशा वेळीं निराशाजनक परिस्थितीत परत माघारी फिरावे लागते आणि परत दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी जावे लागते त्यामुळे शरीरावर सततचा ताण आल्यामुळे कित्येकांचा मनका किंवा इतर अवयव कायमस्वरूपी खराब झाली आहेत. रुग्णालयाचा खर्च भागवणे त्यांना शक्य होत नाही कामगारांची अनेक ठिकाणी काम करत असताना पायावर सिलेंडर पडून अपघात होत असतात घरोघरी गॅस सिलेंडर घेऊन जाताना रस्त्यात अपघात होऊन मृत्यू देखील झालेली आहेत कधी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने अपघात होऊन देखील जखमी किंवा मृत्यूमुखी पडतात, सिलेंडर हातापायावर पडून कित्येक वेळा त्यांच्या हाताचे व पायाचे बोटे तुटतात, पाय मोडतात, हात मोडतात, छोटे-मोठे किरकोळ फ्रॅक्चर तर सतत होत असतात,

परंतू त्यावेळी त्याचा खर्च कोणीही त्यांना देत नाही, गॅस एजन्सी मालक किंवा तेल कंपन्यांकडून सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी साधनसामुग्री मिळत नाही त्यामुळे देखील कित्येक कामगाराची अपघात होऊन त्यांना इजा पोहोचत असते.
कामाची हमी नाही
असंघटित गॅस एजन्सी कामगारांची नोकरी ही कधीच कायमस्वरूपी नसते त्यांना कोणत्याही छोट्या मोठ्या चुका झाल्यातरी त्यांना कितीही वर्ष पासुन ते त्या गॅस एजन्सी मध्ये काम करत असले तरीही कसलेही कारण न देता कामावरून काढून टाकतात आणि नंतर त्याला कुठेही लवकर काम सुद्धा मिळत नाही. कामगारांची जीवघेणी धडपड आणि कायमस्वरूपी असलेल्या खाजगी कारखाने, आस्थापना, सरकारी कामगार, यांच्यात विषमतेची मोठी दरी आहे अशा संघटित असलेल्या कामगारांना किंवा सरकारी बाबुंना वार्षिक सुट्ट्या, पगारी रजा, आजारपणातील खर्च, घराचे भाडे, बोनस, आणि कुटुंबातील इतर व्यक्तींसाठी सुद्धा आजारपणातील खर्च मिळतो दरवर्षी पगार वाढीचे वेगवेगळे करार होतात . त्यांना चांगला विमा मिळतो , त्यांच्या मृत्यूनंतर ही वारसांना मिळणारे फायदे भरपूर असतात.
याउलट असंघटित गॅस एजन्सी कामगारांना तसेच इतर असंघटित कामगारांना असे कोणतेही खर्च अथवा फायदे मिळत नाही तसेच आजारपणातील खर्च मिळत नाही किंवा मृत्यू विमा मिळत नाही किंवा अपघाती मृत्यू झाल्यावर नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही. कुटुंबातील कर्ता व्यक्ती असलेला कामगार मरण पावल्यास त्याचे कुटुंब उघड्यावर येते. अनेक संकटे उभी राहतात. त्यांना मिळणारी वेतन ही समाधानकारक मिळत नाही ग्राहकांकडून बक्षीस किंवा टीप स्वरूपात थोडेफार पैसे जमवून आणि कमी प्रमाणात मिळणारे महिना वेतन किंवा तुटपुंज्या स्वरूपात मिळणारे प्रतेक एक सिलेंडर डिलिव्हरी केल्यावर मिळणारे कमिशन असे एकत्र मिळून देखील वाढलेली महागाई, मुलांचे शिक्षण,आरोग्य,घरभाडे, हा संसाराचा गाडा चालवण्यासाठी सुद्धा ते पैसे पुरत नाही तर स्वतःचे घर व्हावे यासाठी कितीही धडपडले तरी पैसे पुरत नसल्यामुळे डोक्यावरचे छत मिळविण्याचे स्वप्न अधुरे राहून जाते. कित्येक कामगारांच्या दोन पिढी गॅस एजन्सी कामगार म्हणून काम करत आहेत पण स्वतःचे साधे घर देखिल त्यांना करता आले नाही.
सुरक्षा कायद्याची गरज
ज्याप्रमाणे संघटित क्षेत्रातील तसेच सरकारी क्षेत्रातील कामगारांना निर्वाह निधी, आरोग्य विमा, बोनस, पेन्शन, मृत्यू विमा असे लाभ मिळतात त्याचप्रमाणे असंघटित अशा गॅस एजन्सी कामगारांना सुद्धा किमान वेतन, आरोग्य विमा, मृत्यू विमा, आणि पेन्शन मिळणे गरजेचे आहे यासाठी सामाजिक सुरक्षा कायदा करण्यात आला मात्र आर्थिक तरतूद नसल्याने अथवा निधी नसल्याने पुढे काही झाले नाही देशाच्या आणि राज्याच्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली जाते मात्र अंमलबजावणी होत नाही. समाजाचा महत्त्वाचा घटक असलेल्या म्हणजेच गॅस सिलेंडर म्हणजे एक प्रकारचा जिवंत बॉम्ब त्यासाठी त्याची पहिल्यांदा तपासणी करून मगच प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन गॅस सिलेंडर दिल्याशिवाय लोकांच्या घरात अन्न शिजवले जात नाही, आणि एखादा सिलेंडर जर नजरचुकीने तपासला गेला नाही आणि तो कुठेही लिकेज असेल तर तो सिलेंडर एखाद्या ग्राहकाच्या घरी गेला तर त्याच्या घरामध्ये स्फोट होण्याची देखील शक्यता असते, एखाद्या दिवशी जर गॅस एजन्सी कामगारांनी सुट्टी घेतली तर अनेकांच्या घरी गॅस शेगडी ही पेटत नाही, आणि त्यांच्या मागण्या पुर्ण व्हाव्यात म्हणुन जर काही दिवस गॅस एजन्सी कामगार संपावर गेला तर देशात खूप मोठी अडचण निर्माण होणार आहे परंतू अत्यावशयक सेवा असल्याने त्यांना कसलीही सुट्टी घेता येत नाही आणि घेतलीच तर बदल्यात कोणीतरी दुसरा कामगार द्यावा लागतो. सध्या अनेक शहरांमध्ये पाईप लाईन द्वारे घरामध्ये गॅस पाईप लाईन आल्यामुळे कित्येक कामगारांच्या नोकऱ्या जात आहेत त्यांना त्यांच्या वयानुसार परत कुठेही साधी नोकरी सुद्धा मिळत नाही, कारण त्यांनी अनेक वर्षे कोणत्यातरी एका गॅस एजन्सीमध्ये नोकरी केलेली असते आणि त्यांचे वय सुद्धा जास्त झालेली असते. आणि परत या वयामध्ये त्यांना कुठे नोकरी मिळेल याची काहीच आशा नसते, यासाठी अशा गॅस एजन्सी कामगारांना काहीतरी पेन्शन योजना सुरू करावी, जेणेकरून त्यांची नोकरी गेली तरी त्यांना त्यांच्या उपजीविकेचे साधन म्हणून त्या मिळणाऱ्या पेन्शन मधून त्यांच्या कुटुंबाचा खर्च चालेल म्हणजेच इतके महत्त्वाचे काम करत असलेल्या कामगारांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी गरज आहे ती सामाजिक सुरक्षा कायद्याची आणि लोकांनी गॅस एजन्सी कामगारांना समजून घेण्याची
गॅस कामगारांना रोडवर होणारा त्रास
रस्त्यावरून गॅस एजन्सी कामगार हा ग्राहकांच्या घरी लवकरात लवकर सिलेंडर पोहोचावा म्हणून त्याच्या गडबडीने तो जात असताना कुठेतरी त्याला नो पार्किंग मध्ये सुद्धा गाडी उभी करावी लागते किंवा कधीतरी त्याला नो एन्ट्री मधून सुद्धा थोडा प्रवास करावा लागतो किंवा कधीतरी त्याला फार ट्राफिक मध्ये सुद्धा गाडी उभी करून सिलेंडर द्यायला जावे लागते तेव्हा मात्र लोकांचा तर त्रास असतोच परंतु पोलीस बांधवांचा देखील त्याला खूप त्रास होत असतो, तसेच चौका चौकामध्ये वाहतूक पोलीस त्यांना अडवून त्यांच्याकडे गॅस सिलेंडर वाहतूक करण्याचा परवाना आहे का याची चौकशी करत असतात, परंतु इतर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो प्रमाणेच या वाहनांमध्ये सुद्धा गॅस सिलेंडर वाहतूक केली जाते त्यासाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा परवाना कुठल्याच विभागाकडून गॅस एजन्सी कामगारांना किंवा गॅस एजन्सी मालकांना मिळत नाही. तरीदेखील त्यासाठी त्यांना भरपूर गोष्टीचा सामना करून आपल्या दिवसाचे पूर्ण काम वेळेत करण्याची गरज म्हणुन ते आलेल्या परिस्थितीला तोंड देत पुढे जात असतात. जर का त्यांनी त्याच ठिकाणी त्यांचा वेळ घालवला तर पुढे ग्राहकांना वेळेत सिलेंडर मिळाले नाही तर ग्राहकांच्या घरी चूल पेटत नाही. म्हणून गॅस एजन्सी कामगारांना सर्वांचे सहकार्य असावे ही माफक अपेक्षा.
गॅस एजन्सी कामगार मधील अजून एक घटक गॅस मेकॅनिक
गॅस एजन्सी कामगार मध्ये गॅस सिलेंडर व गॅस शेगडी दुरुस्ती किंवा चेक करणारे मेकॅनिक, यांना ही २४ तास सेवा द्यायची हमी असते, कारण कोणत्या घरात कधी गॅस सिलेंडर किंवा शेगडी लीकेज होईल याची शास्वती नसते त्यामुळे कधीही कोणाचाही कॉल आला की लगेच अर्धा तासात त्यांना आपल्या कुटुंबाला मुला-बाळांना, पत्नीला सोडून लगेच तिथे पोहचायचे असते आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतः चा जीव धोक्यात घालून त्याठिकाणी काम करून द्यायचे असते, आणि त्यांना ही मिळणारे वेतन हे अगदी तुटपुंजे असते, कित्येक ठिकाणी तर गॅस मेकॅनिक ला कसलेही वेतन मिळत नाही, त्यांना ग्रहाकाकडून मिळणाऱ्या टीप किंवा बक्षीसवर अवलंबून रहावे लागते किंवा छोट्या मोठ्या गॅस शेगडी च्या सर्व्हिसिंग कामातून थोडे फार पैसै जमा करून आपला संसाराचा गाडा चालवण्यासाठी ते रात्रंदिवस काम करत असतात, त्यांनाही बऱ्याच लोकांना तोंड द्यावे लागते तेव्हा कुठे रोजचे त्यांना ४००-५०० रु मिळतात. तसेच गॅस एजन्सी ऑफिस कामगारांना देखील जास्तीत जास्त वेळ काम करून सुद्धा किमान वेतन मिळत नाही. दिवसभर लोकांचे कॉल येत असतात त्यांना आनंदाने उत्तर देऊन समाधानी करावे लागते, तसेच कित्येक ग्राहकांना रोज तोंड द्यावे लागते. त्यामुळे यांचाही विचार करावा.

असंघटित गॅस कामगारांसाठी पुढील काही मागण्या प्रामुख्याने आहेत
⭕ तेल कंपनीचा जास्तीत जास्त CSR फंड हा गॅस एजन्सी कामगारांवर खर्च व्हावा आणि कामगाराच्या कल्याणाचे नियोजन व्हावे, हिताचे निर्णय घ्यावेत
⭕ किमान वेतन महिना 25 हजार रुपये असावे किंवा कमिशन स्वरूपात जर असेल तर प्रत्येक सिलेंडर साठी 30 रुपये कमिशन असावे
⭕ गॅस एजन्सी मेकॅनिक देखील किमान वेतन 25 हजार रुपये असावे किंवा ग्राहक आधारित कमीशन द्यायचे असल्यास 200 रू कमिशन मिळावे
⭕ असंघटित गॅस एजन्सी कामगारांना व मेकॅनिक ला तेल कंपनीकडून किंवा गॅस एजन्सी मालकाकडून अपघाताने किंवा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास मृत्यू विमा म्हणून 30 लाख रुपयांचा मृत्यू विमा त्यांच्या वारसांना द्यावा जेणेकरून त्यांच्या नंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोठा त्रास सहन करावा लागणार नाही.
⭕ आरोग्य विमा म्हणून छोटा मोठा अपघात असेल किंवा गॅस सिलेंडर हातापायावर पडून होणारी दुखापत किंवा आजारपण यासाठी दहा लाख रुपयांचा आरोग्य विमा द्यावा आणि तो कुटुंबातील सर्व व्यक्तींना लागू असावा
⭕ दिवाळी व सणासुदीला ऍडव्हान्स तसेच बोनस देणे गॅस एजन्सी मालकांना किंवा तेल कंपनीला सक्तीचे करावे आणि तो कमीत कमी 30 ते 40 हजारापर्यंत असावा
⭕ प्रत्येक गॅस एजन्सी कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे वर्षातून एकदा आरोग्याचे चेकअप करावे, त्यामध्ये काही आजार आढळल्यास लगेच त्यावर मोफत इलाज व्हावेत
⭕ असंघटित गॅस एजन्सी कामगारांची औद्योगिक स्तरावर नोंद करून त्यांच्यासाठी श्रमिक आवास (घरकुल) योजना राबवावी जेणेकरून गॅस एजन्सी कामगारांना स्वतःचे हक्काचे छत मिळेल
⭕ संपूर्ण देशभरात गॅस एजन्सी कामगारांची संख्या ही ८० ते ९० लाख च्या पेक्षा जास्त असल्याने म्हणजे १ कोटी पेक्षा कमी नाही त्यामुळे त्यांचे स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे किंवा देशाच्या कामगार कल्याण महामंडळात गॅस एजन्सी कामगारांना स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात यावे
⭕ सर्व गॅस एजन्सी कामगारांना रेशनिंग कार्ड सारख्या स्वरूपात एक कार्ड किंवा गॅस कामगार रेशन कार्ड देऊन त्यांना माफक दरात डाळी, तूप, तेल, साखर, चहा, खोबरे, कडधान्य, गहू, तांदूळ, या सर्व वस्तू माफक दरात मिळाव्यात
⭕ ज्याठिकाणी ते गॅस एजन्सी कामगार काम करत आहेत त्याच ठिकाणी त्यांना वयाच्या ६० पर्यंत कायम करून घेण्यात यावे.
⭕ गॅस एजन्सी कामगारांना भविष्य निधी म्हणून PF ची सुविधा चालु करावी त्यातील अर्धा वाटा कामगाराचा आणि राहिलेला अर्धा वाटा गॅस एजन्सी मालक आणि तेल कंपनीचा असावा
