पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] परभणी जिल्ह्य़ातून अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडल्याची बातमी समोर येत आहे. सेप्टिक टॅंकची साफसफाई करत असताना पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. ही घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा परिसरामध्ये एका शेतामध्ये काल ११ मे रोजी मध्यरात्री घडली आहे.
सोनपेठ तालुक्यामध्ये असलेल्या भाऊचा तांडा येथील एका शेतामध्ये शेख सादेक, शेख जुनेद, शेख शारोक, शेख नवीद, शेख फेरोज, जमीर शेख शौचालयाच्या सेप्टिक टॅंकची साफसफाई करण्यासाठी गेले होते. ते दुपारचे तीन वाजल्यापासून त्यांची साफसफाई करत असताना मध्य रात्री उशिरा अचानक त्यांना गुदमरल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. हा प्रकार त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळतात आरोग्य विभागाने रुग्णवाहिका भाऊचा तांडा येथे पाठवली.
घटनेची माहिती मिळतात पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. तर एका जणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर परळी येथील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. शेख सादेक, शेख जुनेद, शेख शारोक, शेख नवीद, शेख फेरोज असे गुदमरून मृत्यू झालेल्या मजुरांची नावं आहेत.
