पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] किवळे येथील होर्डिंग कोसळल्यानंतर अनधिकृत होर्डिंग्जवर जिल्हा प्रशासनाची आता करडी नजर ठेवून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येईल. आगामी मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल नव्याने ऑडीट करा असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.यावर पुणे सोलापूर महामार्गावरील अस्तित्वात असलेल्या होर्डिंगची तपासणी होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नव्याने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडीटचा दाखला 15 दिवसांत सादर करणे बंधनकारक करण्यात आले असून, पिंपरी चिंचवड येथे 17 एप्रिल रोजी होर्डिंग पडून 5 जणांचा मृत्यू झाला होता.
पुणे ग्रामीण हद्दीतील स्ट्रक्चरल ऑडीट न केलेली सर्व होर्डिंग अनधिकृत समजून संबंधित होर्डिंगधारकांना नोटीस देऊन तात्काळ काढून टाकण्याची कारवाई करा, असे आदेश देखील देण्यात आले आहेत. धोकादायक, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या होर्डिंगवर तात्काळ कारवाई करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश दिले आहेत.
अवकाळी पाऊस व येऊ घातलेल्या मान्सूनच्या हंगामात पडणाऱ्या पावसाची शक्यता विचारात घेऊन जीवित व मालमत्ता हानी तसेच वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदेश देण्यात आले आहेत.
अलिकडे पूर्व हवेलीत महामार्गावर असे अनधिकृत होर्डिंग मोठ्याप्रमाणात उभारण्यात येत आहेत याला संबंधित विभागाकडून परवाणगी आहे किंवा नाही याची खातरजमा करून कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
