पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे येथील कात्रज घाटात मालमोटार आणि खाजगी प्रवाशी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले, तर 22 जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांकडून मदतकार्य सुरू आहे.रात्री दोनच्या सुमारास एका साखर घेऊन जाणारा ट्रक आणि खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला आहे. या अपघातात 4 नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकच्या केबिनचा अपघातात चक्काचूर झाला आहे. हा अपघात कात्रज घाटाजवळ स्वामी नारायण मंदिर या ठिकाणी झाला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. चार जणांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.
हा अपघात झाला तेव्हा सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. साधारण रात्री दोनच्या सुमारास अपघात झाला आहे. पुणे बेंगलोर महामार्गावर स्वामी नारायण मंदिर आहे. त्या ठिकाणी हा अपघात झाला आहे. अपघातात चार जण जागीच ठार झाले आहे. 22 जण जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. या मृत लोकांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच कात्रज पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत.
या बसमध्ये एकूण 21 प्रवासी, 1 चालक, आणि एक सहाय्यक असे एकूण 23 जण होते. तर साखर घेवून जाणाऱ्या ट्रकमध्ये एक चालक, दोन मालक असे तीनजण होते. त्यापैकी ससून हॉस्पिटल येथे पाच, चव्हाण हॉस्पिटल येथे नऊ,नवले हॉस्पिटल येथे सहा, मंगेशकर हॉस्पिटल येथे दोन, असे एकूण 22 जण उपचार घेत आहेत. स्थानिक नागरिकांनी ही घटनास्थळी अपघातानंतर धाव घेऊन मदत करण्यास सुरुवात केली. रात्रीचा अंधार असल्याने मदत करण्यात अडथळा येत होता. अपघातातील इतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
