पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत कासुर्डी (ता. दौंड) या गावच्या हद्दीतून वाहणार्या कालव्यात सात ते आठ महिन्याची गरोदर असलेल्या अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने आत्महत्या केली की तिचा खून झाला किंवा काही अपघात झाला आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेत महिला गरोदर असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासुर्डी गावच्या हद्दीतून वाहणार्या कालव्यावर काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी एका महिलेला एक ३५ ते ४० वर्ष वय असलेली एक महिला ही पाण्यात वाहत आल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी ही बाब गावच्या पोलीस पाटील अश्विनी सोनवणे यांना दिली.यावर त्यांनी याची माहिती यवत पोलिसांना कळवली.यवत पोलिसांनी या महिलेचे शव बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र यवत येथे पाठविले.
कालव्यात आढळलेली मृत महिला गरोदर आहे. त्या दृष्टीने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.यवत पोलिसांनी संबंधित महिले संदर्भात कोणाला माहती असल्यास यवत पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.
