पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह]
राज्यातील काही पतसंस्था परतफेडीसाठी कर्जदारांकडून पुढील तारखेचे कोरे धनादेश घेत असल्याच्या तक्रारी सहकार आयुक्त कार्यालयात आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर कर्जास तारण म्हणून पतसंस्थांनी कर्जदारांकडून केवळ स्वाक्षरी असलेले धनादेश स्वीकारू नये. धनादेश स्वीकारताना कर्जदारांकडून त्यांच्या हस्ताक्षरात दिनांक,रकमेचा तपशील घेऊनच स्वीकारण्यात यावेत, अशा सूचना सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी राज्यातील सर्व पतसंस्थांना दिल्या आहेत.
काही कर्जदाराकडून सर्रासपणे कोरे धनादेश स्वीकारत असल्याचे निदर्शनास आले आहे. कर्जदार पूर्णतः पतसंस्थांनी मागितले म्हणून कोरे धनादेश देतो. त्यावर फक्त स्वाक्षरी केलेली असते. त्या चेकवर तारीख, रक्कम याचा उल्लेख नसतो. यातून पुढे अनेक वाद निर्माण होतात. याप्रश्री सहकार विभागाकडे कोरे धनादेश स्वीकारत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर अशा आळा घालण्यासाठी आयुक्तांकडून या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
कर्जदाराच्या हस्ताक्षरात पूर्ण धनादेश भरून स्वीकारल्यानंतर पतसंस्थांनी त्याबाबतचा फॉर्म भरून फॉर्ममध्ये कर्जदाराचे नाव, किती रकमेचे कर्ज घेतले आहे, तारण म्हणून कोणत्या बँकेचे चेक देत आहे त्या बँकेचे नाव, चेक क्रमांक, किती रकमेचा चेक, एकूण किती चेक दिले आहेत, याची माहिती या फॉर्मवर असणार आहे. तसेच कर्जदाराने सहकार स्वहस्ताक्षरात सर्व माहिती भरून व स्वाक्षरी करून दिलेले आहेत, अशी नोंद त्यावर कर्जदारांच्या हस्ताक्षरात घेतली जाणार आहे. भरून याबाबतची माहिती सर्व बिगर कृषी सहकारी पतसंस्थांच्या निदर्शनास आणून द्यावी व सूचनांचे तंतोतंत पालन पतसंस्थांकडून होईल, याबाबतची दक्षता घ्यावी, अशा सूचना सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिल्या आहेत.
