पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] आतापर्यंत आपण घर, गाडी, मोबाइल अशा काही दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू तर काही चैनीच्या वस्तू इएमआयवर घेतो तशी सोय असते परंतु पुण्यात आता चक्क आंबा देखील ग्राहकांना ईएमआयवर घेणे शक्य झाले आहे.

पुण्यातील आनंद नगर परिसरातील ग्रीन मँगोजचे गौरव सणस यांनी ग्राहकांसाठी ही सुविधा आणली आहे. आंबा विकत घेऊन खाणं ही मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी चैन ठरावी, अशा किंमतींत आंब्याची विक्री होत आहे. आंबा हे फळ वर्षातून एकदाच मिळणारं फळ. त्यामुळे खवय्यांना आंबा खाण्यापासून वंचित राहावे लागू नये, म्हणून सणस यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. पॉइंट ऑफ सेल प्रकारच्या यंत्राचा वापर पेमेंट स्वीकारण्यासाठी केल्यामुळे क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करुन आंबा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांचे बिल ‘इएमआय’ मध्ये बदलून देणे सणस यांना शक्य झाले आहे.

सणस म्हणाले की, देवगड हापूस हा सर्वोत्तम चवीचा आंबा खायचा तर किमान सहाशे ते १२०० रुपये डझनामागे मोजावे लागतात. ही किंमत ऐकून अनेकदा ग्राहक दर्जाशी तडजोड करतात आणि परवडणाऱ्या दरात मिळेल त्या दर्जाचा आंबा घेतात.बाजारात आंबा कमी आणि जो आहे तो सोन्याच्या भावाने विकला जातो. त्यामुळे आंब्याचे दर हा सध्या सर्वसामान्य नागरिकांना आवाक्याबाहेर आहेत. आंबा विकत घेऊन खाणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावे म्हणून पुण्यातील विक्रेत्याने आंबा चक्क ईएमआयवर घेऊन जा अशी सोय ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *