पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार असलेला आरोपीस गुन्हे शाखा यूनिट ६ ने जेरबंद केले.
युनिट ६ कडून मिळालेल्या माहितीनुसार, पथकातील अंमलदार वाघोली गावच्या हद्दीत गस्तीवर असताना ऋषीकेश ताकवणे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी योगेश उर्फ सॅम ऊर्फ बाबा जगदीश सोनवणे वय २३ वर्षे रा. घर नंबर ७३४, ए डी कँप चौक, नाना पेठ, पुणे हा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथील सन २०१६ मधील गुन्ह्यातील आरोपी असून तो वाघोली येथील चोखी धानी रोड वरील आर के हॉटेल जवळील मोकळ्या मैदानात थांबलेला आहे. अशी पक्की माहिती मिळाल्यानंतर ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांना कळवून मिळालेल्या माहितीप्रमाणे जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने त्यास शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले.
आरोपी हा रेकॉर्डवरील असून त्याच्यावर या पुर्वी पुणे शहरातील उत्तमनगर, वारजे माळवाडी, येरवडा, समर्थ, कोंढवा, विमाननगर सहकारनगर, भारती विद्यापीठ, कोरेगांव पार्क, खडकी तसेच पुणे ग्रामीण हद्दीतील जेजुरी, हवेली या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याची वैद्यकीय तपासणी करुन पुढील तपासकामी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २ चे नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी पोलीस नाईक रमेश मेमाने, पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे यांच्या पथकाने केली आहे.
