पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुण्यातील अग्रेसर असलेल्या जिजामाता सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल त्यांच्या पत्नी रेखा बांदल आणि शिरुर बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे उतरल्याने या निवडणुकीला चांगलाच रंग चढणार आहे
मागील पंचवार्षिक निवडणुकीत आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुजाता पवार, नियोजन मंडळाचे माजी सदस्य पंडीत दरेकर हे दोघे बिनविरोध निवडले गेले होते. त्यामुळे यावेळेस बॅंकेच्या या निवडणुकीत पवार-बांदल असा अप्रत्यक्ष सामना रंगणार आहे. या वेळी मात्र सुजाता पवार निवडणुकीच्या रिंगणात नाहीत.
सुमारे २२ हजार सभासद मतदार असलेल्या पुण्यातील जिजामाता सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक १५ एप्रिल रोजी पार पडणार आहे, आणि दि. १६ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. ही निवडणूक १३ संचालक पदासाठी होत असून बॅंकेच्या एकुण १२ शाखांपैकी ३ शाखा शिरुर, शिक्रापूर व मांडवगण-फराटा येथे असून एकुण मतदानापैकी ६५०० मतदान शिरुरमध्ये असल्याने ही निवडणूक शिरुरकरांसाठी महत्वाची आहे.
बॅंकेच्या एकुण १३ पैकी ८ जागा या महिला संचालकांच्या सर्वसाधारण गटात असून अनुसुचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग, खुला वर्ग व पुण्यापासून २५ किलोमीटर बाहेरील महिलांसाठी अशा प्रत्येकी एक जागा प्रत्येक गटातून आहे. मागील वेळी २५ किलोमीटर कक्षेबाहेरील महिला संचालक म्हणून सुजाता पवार तत्कालीन माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकरांच्या माघारीने बिनविरोध, तर खुल्या वर्गातून पंडीत दरेकर बॅंकेत निवडून गेले होते. यावेळी मात्र निवडणुकीत राजकीय रंग भरला असून बांदल व मांढरे यांच्या सहभागामुळे शिरुरचे राजकारण ढवळून निघणार हे निश्चित.
