पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन सांगलीत करण्यात आलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीनंतर महिला कुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची पुण्यात पत्रकार परिषद पार घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि पुणे शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बराटे उपस्थित होते.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीमधील निर्णयानुसार 23 आणि 24 मार्च रोजी सांगलीत या स्पर्धा पार पडतील. सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेव मोहिते यांनी दिली आहे.

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दहा वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. त्यानुसार 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 असे वजनी गट असतील. महाराष्ट्र केसरीसाठी 65 वजनी गटावरील मल्ल खिताबासाठी लढणार आहेत. ही स्पर्धा फक्त मॅटवर होईल.

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजयी महिला कुस्तीगीरास महिला केसरी खिताब आणि चांदीची गदा देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे कार्याध्यक्ष तसेच सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान नामदेवराव मोहिते यांनी माहिती दिली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *