थेऊर [हवेलीनामा वृत्तसमुह] जुनी पेंशन योजना लागू करावी यासाठी राज्यभरातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने सर्व यंत्रणाच ठप्प झाल्या आहेत विशेषतः आरोग्य व शिक्षण यंत्रणेवर मोठा परिणाम झाला आहे.पूर्व हवेलीतील बहुतेक सर्वच गावातील शाळेला कुलूप असून प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना सेवा मिळू शकत नाही.
सन 2005 व त्यानंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात आली नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करावी यासाठी राज्यभरातील सर्व कर्मचारी संघटनांकडून बेमुदत संपावर जाण्याचे हत्यार उपसले आहे.काल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी कामगार प्रतिनिधींसह चर्चा केली परंतु मार्ग निघाला नाही.याचा परिणाम आजपासून हे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेले याचा परिणाम शासकीय सेवेवर पडला.ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज अनेक रुग्ण औषधोपचार घेण्यासाठी पोहोचले परंतु त्यांना सेवा मिळाली नाही.
राज्यात सर्वत्र मोसमातील बदलामुळे सर्दी खोकला तापाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात असून गरीब नागरिकांना हक्काचा दवाखाना म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र पण आज ही सेवा मिळत नसल्याने त्यांना परतावे लागले.
तर शैक्षणिक विभागातील प्राथमिक शिक्षक मोठ्याप्रमाणात संपात सहभागी असून परिक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.अगोदर कोरोनाच्या काळात मोठी शैक्षणिक हानी झाली त्यानंतर आता कुठे हळूहळू पूर्वपदावर येत असताना अधिवेशन आणि आता संप याचा परिणाम होणार आहे.
