थेऊर [हवेलीनामा वृत्तसमूह] विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाच्या जडणघडणीत शालेय शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.यातील महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे प्राथमिक शिक्षण होय.याच कालावधीत घेतलेल्या मुल्य शिक्षणाच्या शिदोरीवरच व्यक्तीमत्व विकसित होते.अशांपैकी एक असलेल्या हवेली तालुक्यातील मूळामुठा नदीच्या तीरावर वसलेले, ऐतिहासिक वारसा लाभलेले हिंगणगाव येथे इयत्ता सातवीत शिक्षण घेतलेल्या सन १९९२/९३ च्या विद्यार्थ्यांनी “जीवन शिक्षण विद्यामंदिर हिंगणगाव”या शाळेत तब्बल तीस वर्षानंतर हजेरी लावली. ज्या शाळेत आपण शिकलो, जेथे आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास झाला,शिक्षणाचा पाया पक्का झाला, त्या शाळेचे आपण काही उतराई व्हावे ही एकच भावना घेऊन सर्वजण एकत्रित आले
येथील शिक्षकांनी जुने आणि नव्याशी सांगड घालत मार्गदर्शन केले. सविता कोतवाल यांनी सूत्रसंचालन केले तर विजय थोरात यांनी सर्व नियोजन पाहिले. आनंदाने जगा आणि जगू द्या हा मोलाचा मंत्र प्रभाकर जगताप यांनी दिला तर हेमा थोरात यांनी जीवनात शिस्त आणि आत्मसंयम माणसाला महान बनवतात असे आपले मनोगत व्यक्त केले.त्याच प्रमाणे संतोष शिंदे, अमित कुंकुलोळ,मनोज कुंभारकर, नंदा शिंदे, ताई शिंदे, संगिता थोरात, विजय थोरात यांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला तर राजू वेताळ यांनी मित्र असावा गारव्यासारखा ही भावनीक कविता गाऊन अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
“माझी शाळा, माझी माती, माझी माणसं” या शब्दांना स्मरून लक्ष्मीतरूची झाडे, शोभेची झाडे , संभाजी महाराजांची प्रतिभा शाळेला भेट दिली तसेच मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.
