पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) जालना जिल्ह्यातील परतूर पोलीस ठाण्यातूनच अडीच लाखांचा गुटखा चोरी झाल्याची घटना घडली आहे. पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्हीमध्ये तीन वेळा गुटखा चोरी करतांना पोलीस मित्रच कैद झाला आहे.जालना जिल्ह्यातील परतूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील जप्त असलेला गुटख्याचा साठा एका खोलीत ठेवण्यात आला होता. या खोलीचा ताबा आणि किल्ली पोलीस ठाण्याचे पो. कॉ. भागवत खाडे यांच्याकडे आहे. खाडे यांच्या टेबलच्या ड्रॉव्हर मधून या खोलीची किल्ली गायब झाली होती.

 

त्यानंतर गुन्ह्यात जप्त असलेला गुटखा मोठ्या प्रमाणात गायब झाला असल्याचे लक्षात आले होते. ही बाब लक्षात येताच पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी तातडीने पोलीस ठाण्यात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी केली. त्यावेळी पोलीस ठाण्यात नेहमी वावरणार्‍या व स्वतःला पोलीस मित्र समजणार्‍या छत्रगुण उत्तमराव सोळुंके (रा. सन्मित्र कॉलनी, परतूर) यानेच पोलिसांचा विश्वासघात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.छत्रगुण सोळुंके याने त्या खोलीची किल्ली चोरी करून, त्या खोलीतून 24 जानेवारी 2023 रोजी पहाटे 4.36 ते 4.46 वाजेदरम्यान 50 रुपयांचा प्रीमियम राजनिवास गुटखा असलेल्या 5 गोण्या चोरून नेल्या होत्या. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 5.30 ते 5.42 वाजेच्या दरम्यान गोवा-1000 गुटख्याच्या 1 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 19 गोण्या नेल्या आहेत. असा एकूण 2 लाख 40 हजार रुपये किंमतीचा गुटखा चोरून नेल्याचे निष्पन्न झाल्यामुळे काल, गुरुवारी 9 मार्च रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी छत्रगुण सोळुंके याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार हे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *