पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] निपुण भारत अभियानामुळे जिल्ह्यातील साडेतीन हजार जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यामध्ये ६५३ शाळांमधील २० टक्क्यांहन विद्यार्थ्यांना वाचन करता येत नाही. गणिताबद्दल बोलायलाच नको, विशेष म्हणजे यामध्ये काही शाळांमध्ये आदर्श शिक्षकांच्या शाळा आहेत. त्यामुळे शिक्षक आदर्श मात्र विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत काहीच फरक पडत नसल्याचे उघडकीस आले आहे.

निपुण भारत अभियानानुसार विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते पाचवीच्या – विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत गुणवत्ता कार्यक्रम – राबविण्यात आला. त्यासाठी शाळेतील मुख्याध्यापकांना हे अभियान कशा पद्धतीने राबवायचे याचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची ३ स्तरांवर विभागणी करून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर या उपक्रमाचा कितपत परिणाम झाला. यांसाठी जिल्हा परिषदेने २२ ते २८ फेब्रुवारी कालावधीमध्ये शाळा स्तरांवर सर्वेक्षण केले; मात्र या सर्वेक्षणामध्ये धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे.या सर्वेक्षणानंतर जिल्हा परिषदेच्या ३ हजार ६३६ प्राथमिक शाळांपैकी ३ हजार ४२० शाळांची माहिती मुख्याध्यापकांनी विनोबा ॲपवर नोंदवली. त्यांमध्ये ६५३ अशा शाळा आढळून आल्या की, त्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर काही फरकच पडलेला नाही. भाषा आणि गणितामध्ये सुधारणा होणे अपेक्षित होते. मात्र तसे काहीच झाले नाही. यामध्ये १० पटसंख्या असणाऱ्या शाळांचा समावेश आहे. त्यामुळे अशा शाळांवर शिक्षकच जात नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गुणवत्ता सुधारणा नसणाऱ्या शाळांमध्ये आदर्श शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे शाळांमधील गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जिल्ह्यातील ८९९ शाळांमध्ये सुधारणा होतेय. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या १ लाख ४६ हजार ५५८ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ८९९ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा होत आहे. १ हजार २४९ शाळा ‘६’ असून १ हजार ११४ शाळांची गुणवत्ता साधारण आहे. जिल्ह्यातील १ हजार ६२ शाळांची गुणवत्ता चांगली असल्याचेही निपुण अभियानामुळे समोर आले आहे.

 

प्राथमिक शाळेच्या धर्तीवर माध्यमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा तपासणी करणे आवश्यक आहे कारण अनेक खाजगी शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती गेल्या तीन वर्षांत खालावत गेल्यानंतर यात सुधारणा होणे अपेक्षित आहे.शाळांची तपासणी का होत नाही हा प्रश्न पालकांमधून विचारला जातो आहे.

    

 

 काही दिवसांपूर्वी शिक्षकांच्या गुणवत्ता तपासणीचे आयोजन केले होते. मात्र त्या काळामध्ये तपासणीची एवढी धास्ती शिक्षकांनी घेतली होती. काही शिक्षक आजारी पडले होते. त्यामुळे हे अभियान तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा नाही. तेथील परिस्थिती पूर्वीसारखीच आहे. अशा ३०५ शाळांची ४५ केंद्रे आहे. त्या केंद्राचे प्रमुख आणि मुख्याध्यापकांना रविवारी जिल्हा परिषदेत आमंत्रित करण्यात आले आहेत. त्यांना गुणवत्तेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *