पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] महिलांचे समाजातील महत्त्व अनन्यसाधारण आहे जीवनाच्या प्रत्येक जडणघडणीत तिचा वाटा अतुलनीय आहे, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आदर्श माता पुरस्कार व कर्तृत्ववान महिला पुरस्काराचे वितरण सोहळा हांडेवाडी येथे पार पडला. सुप्रियाताई लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात पुणे शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर यांच्या मातोश्री सौ.सुमन महानोर यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी खासदार सुळे म्हणाल्या की,’ मुलांना घडवताना सर्वच माता, समाज आणि देशाला घडवत असतात. समाजात अनाचार वाढलेला असून महिलांकडून संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम अविरत चालू आहेच आजच्या परिस्थितीत मुलांना चांगले शिक्षण देऊन सुसंस्कृत समाजातील घडविण्याची जबाबदारी येऊन पडली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर होते.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सिने अभिनेत्री अंकीता पनवेलकर , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, मा.नगरसेवक गणेश ढोरे,पी.डी.सी.सी.चे माजी चेअरमन प्रा.दिगंबर दुर्गाडे, उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन भरत झांबरे,व शैला भरत झांबरे यांनी केले होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुप्रियाताई लोकसेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
