पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] अहमदनगर येथून अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका इसमास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळीकांचन परिसरातून अटक केली. त्याच्याकडून २४ लाख रुपये किंमतीचे दोन किलो चरस जप्त करण्यात आले.
याप्रकरणात औरंगजेब पप्पू अन्सारी उर्फ रंगा परदेशी (वय २७, रा. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील उरळी कांचन परिसरात गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना एक जण चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली,यावर पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे असलेल्या पिशवीत चरस सापडले.
परदेशीकडून दोन किलो चरस जप्त करण्यात आले असून त्या चरसची बाजारभावानुसार किंमत २४ लाख रुपये आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक शुभांगी नरके, योगेश मांढरे, युवराज कांबळे, संतोष देशपांडे, संतोष जाधव आदींनी ही कारवाई केली.
