मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह] इयत्ता तिसरी ते दहावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये आता वर्गपाठासाठी वह्याची पाने जोडण्यात येणार असून ही योजना येत्या शैक्षणिक वर्षांपासून लागू करण्यात येणार आहे. या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक घटक, पाठ, कविता त्यांच्या शेवटी वहीची एक ते दोन पाने जोडण्यात येतील. या पानांवर विद्यार्थ्यांकडून वर्गात शिक्षक शिकवत असताना महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोंदी करता याव्यात यासाठी ही सोय असेल. शब्दार्थ, महत्त्वाची सूत्रं, महत्वाचे संबोधन, महत्त्वाची वाक्य या पानांवर नोंद करून ठेवायची आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात याबाबत निर्णय घेण्यात आला होता. आज त्याचा प्रकटीकरण निघाले आहे.
याचा दुहेरी उपयोग होईल शाळेमध्ये शिक्षक प्रत्यक्ष काय शिकवतात याची नोंदी या पानांवर करण्यात येईल तर वर्ग कार्याचा स्तर कसा आहे हे समजण्यास मदत होईल. पाठ्यपुस्तकांना दिलेल्या प्रश्नपत्रिका सराव, वर्गपाठ गृहपाठ यांसाठी वेगळ्या वह्या ठेवण्यास परवानगी राहील. राज्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीसाठी पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरूपात एकूण चार भागांमध्ये विभागून तयार करण्यात यावी व त्यामध्ये प्रत्येक घटक, पाठ, कविता यानंतर वहीचे एक पान समाविष्ट करण्यात येणार आहे.
इयत्ता पहिली आणि दुसरीची पाठ्यपुस्तके देखील चार भागांमध्ये तयार करण्यात येणार असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार सरावासाठी पृष्ठे समाविष्ट करण्यात येतील. खासगी आणि बिनाअनुदानित शाळांमधील इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. पाठ्यपुस्तक मंडळाकडे नियमित पाठ्यपुस्तकांचा शिल्लक असलेला पूर्वीचा साठा तसेच पुस्तक विक्रेत्यांकडे असलेला साठा संपल्यांतर ती पाठ्यपुस्तके एकूण चार भागांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023 आणि 24 साठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
