पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) सावत्र मुलीचा त्रास सहन न झाल्याने सावत्र आईने पाच वर्षाच्या मुलीला चटके देऊन कुठलीतरी कठीण वस्तू डोक्यात मारुन तिचा खून केला आणि, मुलीला फिट आल्याचा बहाणा करून तिला डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन गेली.परंतु वैद्यकीय तपासणीत मारहाण झाल्याचे झाल्यानंत सावत्र आईस उत्तमनगर पोलिसांनी अटक केली.
या बातची माहिती अशी की,श्वेता राजेश आनंद (5, रा.उत्तमनगर, शिवणे) नावाच्या पिडीत मुलीचा मृत्यु झाला. याबद्दल तिच्या 36 वर्षीय सावत्र आई विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल सकाळी 9 ते दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली आहे. या बाबत पोलिस हवालदार घोलप यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, श्वेताचे वडिल एका खासगी कंपनीत कामाला आहेत. श्वेताच्या आईचा मृत्यू झाल्याने त्यांनी दुसरे लग्न केले. श्वेताच्या आईचा मृत्यू झाल्यापासून ती इतर कोणाकडे रहात नव्हती. आईची आठवण येत असल्याने ती सावत्र आईकडे नीट राहत नव्हती. श्वेता सातत्याने त्रास देत असल्याने तिची सावत्र आई तिला मारहाण करत असे. मारहाण करुनही श्वेताचा त्रास कमी होत नसल्याने मागील दोन तीन दिवसांपासून तिने श्वेताला चटके देण्यास सुरुवात केली.नंतर काल सकाळी तिने श्वेताच्या डोक्यात कठीण वस्तू मारुन तिचा खून केला. श्वेता निपचित पडल्यावर पतीला काय सांगायचे, हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर तिने श्वेताला जवळच्या डॉक्टरकडे नेत तिला फिट आल्याचे सांगितले. मात्र, डॉक्टरांच्या तपासणीत ती मृत झाल्याचे लक्षात आले. तसेच तिच्या अंगावर चटके दिल्याचे डाग होते. हा प्रकार संशयास्पद असल्यामुळे रुग्णालयातून पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर सावत्र आईला पोलिसांनी ताब्यात घेतले. तीने मुलगी सतत त्रास देत असल्याने तिला मारहाण करत खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर करत आहेत.
