पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] मानेवर तलवार ठेवून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत परिसरातील घरांवर, गाड्यांवर दगडफेक करून दहशत पसरवत एका मुलावर कोयता उगारुन मारहाण केल्याचा प्रकार फुरसुंगीत घडला. हा प्रकार शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास फुरसुंगीतील ढेरे कंपनीजवळ घडला आहे.
याबाबत ज्ञानेश्वर गुंडीबा कांबळे (वय-43 रा. संकेत विहार, फुरसूंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दिली. यावर रिषभ हिवाळे (रा. ड्रीम्स आकृती समोर, काळेपडळ), रोहन कुदळे (रा. शिवतेज नगर, काळेपडळ), अस्लम शेख (रा. वैष्णवी सिटी, आदर्शनागर), विक्र जगदने, अक्षय कोळी (रा. काळेपडळ), पवन भारती (रा. तरवडे वस्ती) व इतर दोन अनोळखी मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी येथील ढेरे कंपनीजवळ बेकायदेशीर जमाव जमवला, रिषभ हिवाळे याने त्याच्या हातातील तलवार तक्रारदार यांच्या मानेवर ठेवून तुम्हाला सोडणार नाही तसेच घरच्यांनाही सोडणार नाही अशी धमकी दिली.तर टोळक्यामधील एकाने फिर्यादी यांच्या मुलावर लोखंडी कोयता उगारला.
तर एका मुलाला बांबुने मारहाण करुन गंभीर जखमी केले.एवढेच नाही तर टोळक्याकडून परिसरातील घरांवर, टेम्पोवर दगडफेक करुन दहशत निर्माण केली.घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन दहशत पसरवणार्यांचा शोध सुरु केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत
