पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पेण खोपोली मार्गावर भीषण अपघात झाला असून बाळुमामाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला या अपघातात दोन महिलांसह एकूण तीघेजण ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे एक खळबळ उडाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
पेण खोपोली मार्गावर वाकृळ फाटा येथे हा अपघात झाला यामध्ये कारने ट्रेलरला धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन महिलांसह तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पेण येथील खाजगी रुग्णालयात तसेच कामोठे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मोटारीतील सर्व प्रवासी पेण तालुक्यातील सावरसई गावचे रहिवासी आहेत. हे सर्व जण बाळुमामाच्या दर्शनासाठी कोल्हापूरला निघाले होते. गावातून निघाल्यावर अवघ्या चार किलोमिटर अंतरावरच हा अपघात झाला. या अपघातात मोटारीचा चेंदामेंदा झाला असून मृत आणि जखमींना बाहेर काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली.
श्री संत बाळूमामा यांचे समाधी स्थान आदमापूर येथे असून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, कोकण आणि राज्यातील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. हजारो भाविक येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी येत असतात. संत बाळूमामा हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात. त्यांना लोक बाळूमामा म्हणून ओळखतात.
