पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ येथील सहायक वायरमन मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या चार जणांविरुद्ध जुन्नर पोलिसांत गुन्हा दाखल झाला, यात जुन्नर विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे असे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.

खांबावर काम करत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने सोमनाथ युवराज खंडागळे यांचा काल शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला होता. या घटनेने स्थानिक रहिवासी संतप्त झाले व त्यांनी विद्युत वितरण अधिकाऱ्यांना घेरले. सोमनाथ यांचा भाऊ स्वप्नील युवराज खंडागळे याने तक्रार दाखल केली आहे. विद्युत वितरण कंपनीचे जुन्नर विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ वायरमन वाळकू पारू मोरे, उपकेंद्र सहायक कुंडलिक नामदेव तळपे, उपकार्यकारी अभियंता आनंद एकनाथ घुले, कनिष्ठ अभियंता कृष्णा मल्लापा कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वायरमन वाळकु मोरे यांनी बोलल्यानंतर सोमनाथ हा नेहमीप्रमाणे सकाळी कामावर गेला होता. दुपारी विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने विजेच्या धक्क्याने त्याचा खांबावरच मृत्यू झाला. दुरुस्तीचे काम परमीट घेऊन सुरू केले होते. दुरुस्तीसाठी मोरे यांनी खांबावर चढणे आवश्यक होते.विशेष म्हणजे कामाचे परमीट पुन्हा जमा झाले नसताना वीज प्रवाह सुरू केल्यामुळे उपकेंद्र सहायक कुंडलिक तळपे, तसेच उपकार्यकारी अभियंता आनंद घुले व ज्युनिअर इंजिनिअर कृष्णा कोळी यांची देखरेख व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असताना त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली नसल्याने सोमनाथ याचा मृत्यूस जबाबदार असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *